Join us

Konkan Bhat Sheti : कोकणातील पिवळं सोनं मातीमोल होण्याची भीती.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 2:45 PM

जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा चार महिन्यांचा कालावधी संपून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परतीचा पाऊस काही जाण्याचे नावच घेत नाही. परिणामी जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली भातशेती अडचणीत आली आहे.

जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा चार महिन्यांचा कालावधी संपून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परतीचा पाऊस काही जाण्याचे नावच घेत नाही.

परिणामी जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली भातशेती अडचणीत आली आहे. मागील काही वर्षापासून भातकापणीच्या हंगामातच पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

मनुष्यबळ, कामगारांची कमतरता, वन्यप्राण्यांचे उपद्रव, निसर्गचक्रातील बदल यामुळे गेले काही वर्षे भातशेती करण्याच्या प्रमाणात मोठ्या संख्येने घट होत आहे. त्यातच आता अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहता त्यातून कोणताच फायदा होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय भातशेती आहे.

मात्र, आता भातशेती करताना त्यासाठी येणारा खर्च पाहता दुकानातून विकत घेऊन आपली गरज भागविल्यास त्यापेक्षा कमी खर्च होतो. त्यामुळे दरवर्षी भातशेती शेकडो एकर क्षेत्र पडीक होत आहे. भातशेतीचे क्षेत्र कमी होत असल्याने ते वाढविण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्नही केले जातात.

मात्र, शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे शेती करणे अनेकजण टाळत आहेत, गेले आठ ते दहा दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाचे मोठे धुमशान सुरू आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

मागील आठवड्याभरापासून पावसाने हजेरी लावल्याने उभी भात पिके आडवी झाली आहेत. जिल्ह्यातील सर्वच भागात भातशेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात भातशेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. यावर्षी ५० ते ५५ हजार हेक्टरवर भात पीक घेतले आहे पीक चांगलेच बहारात होते.

चांगला उतारा मिळणार या आनंदात असतानाच त्यावर विरजण पडले, वादळी वार्यासह पाऊस झाल्याने शेतात उभे असलेले भातपीक डोळ्यासमोर आडवे झाले. परतीच्या पावसामुळे भातपीक शेतात कुजून जाण्याची भीती आहे. या भागातील ८५ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे.

शासनाने पाहाणी करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आठवडाभर सार्यकाळच्या सुमारास परतीचा मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात बहरलेल्या भात पिकाला नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या शेतकरी संकटात आहेत. वर्षभर केलेल्या मेहनतीवर परतीच्या पावसाने पाणी फेरल आहे. शेतकरी उघड्या डोळ्यांनी हे नुकसानीचे विदारक चित्र पाहत आहे. गंभीर परिस्थितीचा विचार करून महसूल यंत्रणने पंचनामे करण्यासाठी पथके पाठविणे गरजेचे आहे.

पावसाने भातशेतीची अशी गंभीर अवस्था असताना महसूल प्रशासन मात्र झोपलेले आहे. कुठेही पंचनामे करण्यासाठी ते पुढे आले नाहीत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

पावसाने साथ दिल्याने दिवाळीत पिवळं सोनं घरात येणार याची तयारी करीत असतानाच बहरात असलेल्या भातशेतीला परतीच्या पावसाने गाठले आहे. काही भागात सतत चार ते पाच दिवस पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून भात पाण्यात आडवे झाले आहे. तर परत भाताच्या रोपाला अंकुर फुटू लागले आहेत.

मार्गील पावसाळ्याच्या चार महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. पाऊस उत्तम आल्याने शेतीला बहर आला आहे. भातपीक चांगले भरून आले आहे. त्यामुळे यंदा भाताचे पीक उत्पादन वाढीची शक्यता निर्माण झाली होती.

मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवले आहे. ऑक्टोबर महिना अर्धा संपला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सायंकाळी लागत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दसऱ्यानंतर शेतकरी शक्यतो तयार झालेले पीक कापण्यास सुरुवात करतात.

महेश सरनाईकउपमुख्य उपसंपादक, लोकमत सिंधुदुर्ग

टॅग्स :भातशेतीपाऊसकोकणसिंधुदुर्गकाढणीशेतकरीपीक