प्रमोद सुकरे
कराड/रेठरे बुद्रुक: येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात जयवंत आदर्श कृषी योजना राबवली जात आहे. त्याला यश आल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याचाच भाग म्हणजे चार सभासद शेतकऱ्यांनी चालू ऊस गळीत हंगामात शेतात एकरी १३२ टनाहून अधिक उत्पादन घेत लखपती होऊन दाखवले आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत आदर्श कृषी योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून प्रति एकरी १०० टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. दरवर्षी या योजनेत २५०० सभासद शेतकरी सहभागी होतात.
गेल्या ७ वर्षात या योजनेत सुमारे २२ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. सहभागी शेतकऱ्यांना एकरी १०० टनाहून अधिक ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत योग्य मार्गदर्शन केले जाते.
यंदा तर या योजनेत सहभाग नोंदवलेल्या काही शेतकऱ्यांनी एकरी १०० टन नव्हे, तर तब्बल १३२ टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेण्याचा विक्रम नोंदवला आहे.
प्रयोगशील शेतकरी आणि ऊस उत्पादन
१) शेरे (ता. कऱ्हाड) येथील मोहन बाबुराव निकम यांनी एकरी १३४ टन ७६८ किलो टन ऊसाचे उत्पादन घेतले.
२) रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील अजित विलासराव मोहिते यांनी एकरी १३४ टन २८ किलो ऊस उत्पादन घेतले आहे.
३) रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील कारखान्याचे संचालक जे. डी. मोरे यांनी १३२ टन १५४ किलो उत्पादन घेतले आहे.
४) रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील तानाजी माळी यांनी एकरी ९९ टन १३७ किलो ऊस उत्पादन घेतले आहे.
यंदाच्या उसाला प्रती टनास ३२०० रुपये दर कारखान्याने जाहीर केला आहे. मिळालेला दर व एकरी घेतलेल्या उत्पादनातून संबंधित सभासद लखपती बनले आहेत. या यशस्वी शेतकऱ्यांचे कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
अशी आहे जयवंत आदर्श कृषी योजना
▪️योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस लागण व खोडवा व्यवस्थापनाबाबत कृष्णा कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येते.
▪️जमिनीची मशागत, सेंद्रीय रासायनिक तसेच जैविक खत व्यवस्थापन, रोग, किड नियंत्रण इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले जाते.
▪️गेल्या ७ वर्षात या योजनेत २२ हजारांपेक्षा जास्त शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला असून, यामुळे एकरी ऊस उत्पादनात सरासरी १० ते १२ मेट्रीक टनांनी वाढ झाली आहे.
कारखाना राबवत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेमुळेच सभासद शेतकऱ्यांना ही किमया साधता आली आहे. इतर शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीचे तंत्र व जयवंत आदर्श कृषी योजनेचे अनुकरण केले तर तेही नक्कीच लखपती बनतील यात शंका नाही.
अधिक वाचा: Phule Sugarcane 13007 : साखर उत्पादनात ८६०३२ पेक्षा सरस असणारी उसाची नवीन जात आली; वाचा सविस्तर