Krushi Swavalamban Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक सन २०२४-२५ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील) अंतर्गत पूरक अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत ९० टक्के अनुदान मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक या (सूक्ष्म सिंचन) योजना सन २०२४-२५ अंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाची सोडत होणार आहे.
सोडतीमध्ये निवड होऊन लाभ देण्यात आलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील) अंतर्गत पूरक अनुदान देय असल्याने अशा प्रकारे दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना मंजूर मापदंडाच्या ९० टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान मुख्यमंत्री सिंचन योजनेतून अदा करण्यात येईल. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
महाडीबीडीवर करा अर्ज
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अदा करण्यात येणार आहे. उर्वरित १० टक्के/१५ टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना/ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमधून अदा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज महाडीबीटी प्रणालीवर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाची माहिती
* नवीन विहीर पॅकेज : ज्या शेतकऱ्याला नवीन विहीर खोदणे व्यतिरिक्त पंपसंच , वीजजोडणी आकार सुक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग सारख्या बाबी या पॅकेजमध्ये शेतकऱ्याला उपलब्ध करून दिले जातील.
* जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज : ज्या शेतकऱ्याला त्याची जुनी विहीर दुरुस्ती करणे तसेच पंपसंच जोडणी सूक्ष्म सिंचन संच व इनवेल बोअरिंग मध्ये सुधारणा करणे हेतू मदत मिळेल.
* शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज : शेतकरी मित्रांनो ग्रामविकास व जलसंधारण विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘मागील त्याला शेततळे’ या योजने अंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण केलेले आहे. त्याच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ घेता येईल. त्यामध्ये शेतकऱ्याला शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पंपसंच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच या घटकांचा लाभ घेता येईल.
* सोलार पंप जोडणी पॅकेज : ज्या शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलार पंप मंजूर झाला असेल त्या शेतकऱ्यास पंपसंच व विज जोडणी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत लाभार्थीचा हिस्सा रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.
* इनवेल बोरिंग, पंपसंच, वीजजोडणी आकार : ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना अनुदान देय राहील. तसेच सूक्ष्म सिंचन संच मध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन या घटकांचा लाभ देखील अनुज्ञेय राहील.
योजनाच्या अटी व पात्रता
* लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.
* शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
* ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी किमान जमीन धारणा ०.४० हेक्टर असणे आवश्यक आहे.
* ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी किमान ०.२० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक.
* सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त ६ हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक.
* शेत जमिनीचा ७/१२ व ८-अ चा उतारा असणे आवश्यक.
* शेतकऱ्याचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला व शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- रुपये पेक्षा जास्त नसावे.
अर्ज प्रक्रिया : योजनेसाठी अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन करता येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.