Join us

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' कारखान्याने जाहीर केली उच्चांकी उचल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 12:06 PM

कारखान्याकडे या हंगामात (२०२३-२४) ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याची हंगाम २०२३-२४ करिता उसाची उचल प्रतिटन ३२०० रुपये देणार असल्याची माहिती अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत इतर कारखान्यांनी जाहीर केलेल्या उचलीत ही उच्चांकी आहे.चंद्रदीप नरके म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून कारखान्यांचे गाळप सुरू केले आहे. त्याप्रमाणे कुंभी-कासारी कारखान्याकडून प्रतिटन ३२०० रुपये उचल जाहीर केली आहे. कुंभी कारखाना ऊस उत्पादक सभासदांना दर महिन्याला पाच किलो व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दोन किलो सवलतीच्या दरात साखर देत आणखी ८० ते १०० रुपये जादा दर देत असल्याचे सांगितले.यावर्षी पावसाने ओढ दिल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे ऊस उत्पादनात घट होण्याअगोदर शेतकऱ्यांकडून लवकर ऊस घालवून क्षेत्र रिकामे करण्यासाठी महत्त्व दिले जाणार आहे. कारखान्याकडे या हंगामात (२०२३-२४) ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.यावर्षी जेमतेम पाऊस झाल्याने नदीकाठच्या उसाचे पीक चांगले आहे. यामुळे सरासरी साखर उताराही चांगला मिळणार आहे. कारखान्याकडे ११ हजार २३७ हेक्टर क्षेत्र उसाची नोंद आहे. तोडणी वाहतूक यंत्रणाही सक्षम झाली आहे. शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकवलेला ऊस कुंभी-कासारीकडे पाठवून गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :कोल्हापूरसाखर कारखाने