भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी दिनांक २८ व २९ ऑगस्ट रोजी कृषि विज्ञान केंद्र सगरोळीला भेट दिली.
या भेटीदरम्यान डॉ. फुके यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध युनिटची पाहणीकरून सविस्तर उपक्रमांची माहिती घेतली. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मागील बारा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेतला. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार, भारतातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांचा आढावा घेण्याची सार्वत्रिक मोहीम सुरू आहे, त्याच अंतर्गत ही भेट झाली.
तसेच डॉ. फुके यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांना भेट देत उद्यमिता लर्निंग सेंटर, उत्कर्ष, उद्यानविद्या रोपवाटिका, रेशीम उद्योग, सेंद्रिय भाजीपाला युनिट, बीज तंत्रज्ञान युनिट, कस्टम हायरिंग सेंटर, निंबोळी अर्क युनिट, पोल्ट्री युनिट, शेळी पालन युनिट, दुग्ध व्यवसाय युनिट, शेततळे, मत्स्य पालन, शेतीक्षेत्र इत्यादीं प्रक्षेत्रांची पाहणी करून शास्त्रज्ञांशी संवाद साधला. संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांच्याशी संवाद साधताना डॉ फुके यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या कामाचे व त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे भरभरून कौतुक देखील केले.
त्यानंतर कृषि विज्ञान केंद्र सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार यांनी मागील तीन वर्षातील विविध विस्तार कार्यांचे सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी बावलगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सघन कापूस लागवड व दादा लाड तंत्रज्ञान याबद्दल आयोजित कार्यशाळेत डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कापसाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
बेळकोणी येथील शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे आयोजित कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राची टीम व डॉ. फुके उपस्थित होते. डॉ फुके यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विविध कार्यप्रणालींचा आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहित केले. सदर शेतकरी उत्पादक कंपनी सोयाबीन पिकातील बिजोत्पादन तंत्रज्ञान व शेतकर्यांना ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. या कंपनीची एकंदरीत उलाढाल २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून सर्व तांत्रिक मार्गदर्शन कृषि विज्ञान केंद्र सगरोळीचे आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड, कृषि विस्तार विद्यावेत्ता वनामकृवी, परभणी व सर्व तालुका कृषि अधिकारी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बेळकोणी व बरबडा गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. फुके यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत कार्यरत असणारी कृषि विज्ञान केंद्राची वाटचाल अशीच अविरत सुरु राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सर्व आढावा बैठकीच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ माधुरी रेवनवार, प्रा. कपिल इंगळे, डॉ कृष्णा अम्भुरे, डॉ संतोष चव्हाण, डॉ निहाल मुल्ला, डॉ प्रियांका खोले, डॉ प्रविण चव्हाण, वेंकट शिंदे, सुप्रबंध भावसार, रवी मिद्द्लवार, प्रभुदास उडतेवार, बालाजी चंदापुरे, अभय वकील, प्रभाकर मर्कले, चेतन तातोडे, विजय तुडमे, प्रफुल्ल कोलणुरे इत्यादीनी परिश्रम घेतले.