Join us

महिलांनो, पैशाची चिंता आता सोडा; व्यवसायासाठी मिळेल बिनव्याजी कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 3:10 PM

लखपती दीदी या योजनेंतर्गत बचतगटातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लखपती दीदी योजना जाहीर केली होती. या लाभार्थीचे उद्दिष्ट आता दोनवरून तीन कोटी करण्यात आले आहे. जिल्ह्याला विशिष्ट प्रकारचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सव्वा लाख महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत बचतगटातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद सोलापूर, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सोलापूरच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिवाय विविध योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय करण्यास आर्थिक पाठबळ देत प्रवृत्त करण्यात येते.

लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उभा करून देण्याचा प्रयत्न उमेदच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महिलांचे तीन व्यवसाय करण्याचे अपेक्षित उद्दिष्ट उमेदने ठेवले आहे.

लखपती दीदी योजनेसाठी पात्रताया योजनेसाठी वयोमर्यादा नाही. सर्व जिल्ह्यातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बचतगटामध्ये सामील व्हावे लागणार आहे. अर्जदार ही कोणत्याही एका महिला बचतगटाची सदस्य असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे• आधार आणि पॅन कार्ड• पत्त्याचा पुरावा• उत्पन्न प्रमाणपत्र• मोबाइल नंबर• बँक खाते तपशील• पासपोर्ट साईज फोटो

अर्ज कसा करायचा■ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला 'सेल्फ हेल्प ग्रुप' व्यवसाय योजना तयार करावी लागेल.■ व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचतगट हा आराखडा आणि अर्ज सरकारकडे पाठवेल.■ यानंतर सरकार या अर्जाचे पुनरावलोकन करेल.■ अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.■ या योजनेंतर्गत एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले जाते.

लखपती दीदी योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील सव्वा लाख बचतगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी आमची 'उमेद'ची टीम सरकारने दिलेल्या अॅपच्या माध्यमातून प्रत्येक महिलांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती भरण्याचे काम करीत आहोत. शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून महिलांना बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. - मनीषा आव्हाळे, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर

टॅग्स :महिलापंतप्रधानकेंद्र सरकारराज्य सरकारसरकारसरकारी योजनाजिल्हा परिषद