Ladki Bahin Yojana :
परळी/माजलगाव :
लाडकी बहीण ही योजना पुढील पाच वर्षे चालू राहील. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
परळी आणि माजलगावात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा पोहोचली. राज्यात महायुतीकडून राष्ट्रवादीच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्यातील १० टक्के जागा अल्पसंख्यांकांसाठी देण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे पवार म्हणाले.
आगामी निवडणुकीसाठी मला टार्गेट केले जात आहे. परंतु, परळी मतदारसंघातील मतदार माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मी या मतदारसंघातून जिंकून येणारच, असा विश्वास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, आ. प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंकेसह पदाधिकारी उपस्थित होते.
राजकीय वारसाबाबत मौन
यावेळी येथील आ. प्रकाश सोळंके हे अजित पवार यांच्यासमोर आपले राजकीय वारस म्हणून जयसिंग सोळंके यांचे नाव पुढे करतील, अशी अपेक्षा युवकांना होती. परंतु, आ. सोळंके यांनी उमेदवारी व वारसाबाबत काहीच बोलले नाहीत.
तर अजित पवारांकडूनही जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे माजलगावचा उमेदवार कोण असणार? याकडेही लक्ष लागले आहे.