Join us

Ladki Bahin Yojana : लाडक्या भावाने केले योजनेचे पैसे परत काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:09 IST

जालना येथील एका भावाने स्वत: च्या खात्यावर आलेले लाडक्या बहीण योजनेचे पैसे चक्क शासन दरबारी परत केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana :  जालना येथील एका भावाने स्वत: च्या खात्यावर आलेले लाडक्या बहीण योजनेचे पैसे शासन दरबारी परत केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून रक्कम वसूल केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जळगाव सोमनाथ येथील एका भावाने स्वतःच्या नावावर आलेले ७ हजार ५०० रुपये मंगळवारी (१० डिसेंबर) रोजी परत केले.

जालना तालुक्यातील जळगाव सोमनाथ येथील विलास भुतेकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला होता. परंतु, त्यावेळी नजरचुकीने विलास भुतेकर यांचे आधारकार्ड अपलोड झाले होते.

५ डिसेंबर रोजी भुतेकर यांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ७ हजार ५०० रुपये जमा झाले होते. त्यांनी शहानिशा केल्यानंतर पत्नीच्या आधार कार्डऐवजी त्यांचे स्वत: चे आधार कार्ड जोडले गेल्याचे लक्षात आले.त्यानंतर त्यांनी मंगळवारी (१० डिसेंबर) रोजी जालना येथील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन योजनेचे पैसे परत करण्यासाठी असणारा अर्ज भरून दिला. त्यानंतर डीडीद्वारे ७ हजार ५०० रुपये शासनाकडे परत केले.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीनी दिलेल्या अर्जाची पडताळणी होणार असून, अपात्र लाभार्थीची नावे वगळली जाण्याची चिन्हे आहेत.

त्यात पुरुषांच्या नावावरही रक्कम गेल्याचे समोर आले आहे, अशा रकमाही शासनाकडून वसूल केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

आता, नव्या सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या कागदपत्रांची आता तपासणी होणार असून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे जमा करत, खोटी व बनावट कागदपत्रे जमा करत ज्यांनी पैसे लाटले त्यांचे अर्ज बाद केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे, आता लाडक्या बहिणींना धास्ती लागली आहे. तर, दुसरीकडे निवडणुकांच्या निकालानंतर अद्यापही लाडकी बहीण योजनेचा हफ्ता न जमा झाल्याने, पुढील हफ्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रलाडकी बहीण योजनेचासरकारी योजनामहिला आणि बालविकासमहिलाजालना