बुलढाणा : राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र लाभार्थीना वर्षांतून तीन गॅस सिलिंडरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. तथापि, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या महिलांना उपरोक्त योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते.मात्र, त्याची अंमलबजावणी कशी असणार याबाबत स्पष्टता नव्हती. अखेर ४ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या महिलेच्या नावावर गॅस जोडणी करावी लागणार आहे. त्यानंतरच अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल.राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्याचा निर्णय घेऊन ३० जुलै रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली.काही प्रकरणी घरगुती गॅस सिलिंडर जोडणी कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत होती. याबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांना लाभ घेता येत नव्हता.
त्याबाबत शासनाच्या पुरवठा विभागाने सूचना जारी केल्या असून त्यात म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी १ जुलै २०२४ पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतः च्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील.
सबसिडीची रक्कम येणार खात्यात
योजनेतून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध दिले जाईल. शिधापत्रिकेनुसार एकच महिला लाभार्थी पात्र असेल. ८३० रुपये सबसिडी म्हणून बँक खात्यात वर्ग केले जातील. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या ३०० रुपये अनुदानव्यतिरिक्त राज्य शासन ५३० रुपये जमा करणार आहे.
जिल्ह्यातील ६ लाखांवर महिलांना मिळेल लाभ
बुलढाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत ६ लाख ३९ हजार ४७८ अर्ज मंजूर झालेले आहेत. या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन झाल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळेल.
हे आहेत पात्रता निकष
अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा
अर्जदार हा EWS, SC, ST सदस्य असावा
अर्जदार केवळ 5 सदस्यांचे कुटुंब असावे.
असा करा अर्ज
महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ऑनलाईन अर्ज करा
पायरी १ : योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. योजनेचा मुख्य डॅशबोर्ड उघडेल.
पायरी २ : स्कीम पर्यायावर क्लिक करा आणि ऑनलाइन अर्ज करा पर्यायावर क्लिक करा.
पायरी ३ : नंतर तुम्हाला दुसऱ्या पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल आणि तेथे सर्व तपशील भरा.
पायरी ४ : सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करा.
पायरी ६ : सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.