Join us

किसान एक्स्पोमध्ये लाखो शेतकऱ्यांची मांदियाळी! तंत्रज्ञानासहित नव्या गोष्टींची मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:13 PM

काल अखेर किसान शेतकरी प्रदर्शनाची अखेर सांगता झाली.

पुणे : पुण्यातील मोशी येथे किसान शेतकरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरच्या लाखो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. यामध्ये शेतकऱ्यांना अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. यामुळे शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, गोष्टी, प्रयोग, प्रकल्प प्रत्यक्ष पाहायला मिळाले. 

दरम्यान, किसानने १३ डिसेंबर ते १७ डिसेंबर या पाच दिवसांमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सेंटर येथे किसान शेतकरी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये विविध कंपन्या, संस्था, सरकारी कृषी विभाग, उत्पादने, शेती क्षेत्रांत काम करणाऱ्या खासगी संस्था यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर यंत्रे कशी कामे करतात याचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना पाहायला मिळाले.

यंत्र, तंत्रज्ञानाची माहिती

शेती व्यवसायासाठी वापरले जाणारे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेले यंत्र या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये पॉवर टीलर, पॉवर ग्रीडर, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, स्प्रेइंग मशीन, मोटर, पंप, कटर आणि छोटी छोटी साहित्य पाहण्याचा आणि खरेदी करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सोलारवर चालणारे वाहने, विहीरीसाठी लागणारे पंप, स्प्रेयर मशीनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते. 

येणाऱ्या काळातील शेतीतील आधुनिकता लक्षात घेता ड्रोन कसा वापरावा, कमी किंमतीत विकत घेण्याची संधी कुठे आहे यासंबंधी कृषी विभाग आणि खासगी संस्थांकडून मार्गदर्शन करण्यात येते होते. त्याचबरोबर सरकारच्या कृषीविषयक अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचाही या प्रदर्शनात प्रयत्न करण्यात आला होता.

लागवडीपासून, प्रक्रियेपर्यंतची माहिती

पिक लागवडीपासून विक्री आणि प्रक्रिया करेपर्यंत ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याचे मार्गदर्शन या प्रदर्शनात मिळाले. खते, औषधे, कीटकनाशके, फळबाग लागवड, उत्पादन केलेला माल विक्री करण्याची प्रक्रिया, प्रक्रिया उद्योग, निर्यात अशा अनेक बाबींची माहिती वेगवेगळ्या कंपन्या आणि सरकारी विभागाकडून या प्रदर्शनात मिळाली.

देश आणि विदेशातूनही शेतकऱ्यांची हजेरी

किसान हे भारतातील आणि कृषी क्षेत्रातील सर्वांत मोठे प्रदर्शन असून पुण्यातील या प्रदर्शनामध्ये विदेशातील आणि देशातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, झारखंड, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली येथून शेतकरी आले होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनासाठी हजेरी लावली होती. 

पुढचे प्रदर्शन हैद्राबाद येथे 

किसान दरवर्षी भारतातील पुणे आणि हैद्राबाद येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करत असते. पुण्यात डिसेंबर तर हैद्राबाद येथे फेब्रुवारीमध्ये प्रदर्शन भरत असते. पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये किसान प्रदर्शन हैद्राबाद येथे होणार असून या प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हजेरी लावावी असे आवाहन किसानकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे