'फसल बीमा' अंतर्गत पीक विम्याचा अर्ज भरण्याचा उद्या (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. ज्या शेतकऱ्यांचा अर्ज भरायचा राहिला आहे त्यांना त्वरित अर्ज भरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये पिकांचा विमा काढण्याची मुदत वाढवल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने औरागाबादमधील ९० सेतू सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. काही भागात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यातच राज्य सरकारने 'एक रुपयात पिक विमा' देण्याची घोषणा केल्याने अनेक शेतकरी त्यात सहभागी झाले. राज्यात अनेक ठिकाणी विमा भरण्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अडचणी आल्यामुळे विमा योजनेची मुदत 3 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या लांबल्या. त्यातही जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये ढगफुटी सारखी स्थिती निर्माण झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अर्ज किती?
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळपर्यंत एकूण 90 सेतू केंद्रांवर 4 लाख 33 हजार 877 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. एकूण 5 लाख 34 हजार 569 हेक्टरसाठी अर्ज करण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांनी 1 1 लाख 17 हजार 039 रुपयांच्या नुकसानासाठी दावा केला आहे.