टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने यंदा अधिकचा दर मिळेल, या आशेने टोमॅटोच्या लागवडीची मार्चपासून एप्रिलपर्यंत माळशेज परिसरात लगबग सुरू आहे. मात्र, या लागवडीतील टोमॅटोला दर मिळणार की मातीमोल होणार, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.
माळशेज परिसरातील शेतकरी परंपरेनुसार तरकारी पीक करतात. परंतु, भाजीपाल्याचे दर प्रत्येक हंगामात दराचा ताळेबंद नसल्यामुळे शेतकरी नाराज असतो. सध्या नारायणगाव मार्केटला २० किलोंच्या कॅरेटला २०० ते २२५ रुपये बाजारभाव आहे.
यातही बाजार कमी जास्त होत असतात. त्यामुळे आताच्या बाजारभावात भांडवली खर्चदेखील फिटणार नाही, असेही टोमॅटो उत्पादक शेतकरी सांगत आहेत. पण, पुढे बाजारभाव वाढतील, या आशेवर टोमॅटो तोडणी करत असतात. गेल्या वर्षी इतिहासात पहिल्यांदाच टोमॅटोला उच्चांकी दर मिळाला आहे.
सुरुवातीला २० किलोंचे कॅरेट ७० रुपयांपासून तर नंतर २५०० रुपयांपर्यंत भाव होते. त्यावेळी उन्हाळी हंगामात टोमॅटोचे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले. सुरुवातीला टोमॅटोवर प्लॅस्टिक या रोगाने अतिक्रमण केले. काही शेतकऱ्यांचे भांडवलदेखील वसूल झाले. या रोगाने टोमॅटोची नासधूस झाली. शेतकरी त्यावेळी मेटाकुटीला आला होता.
त्यामुळे लागवडीचे प्रमाण झाले होते कमी
- मागील काही महिन्यांपासून टोमॅटो लागवडीची लगबग सुरू आहे. पहिल्या दिवसापासून अखेरपर्यंत मोठी मेहनत वर खर्च सुमारे एकरी दीड लाख रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, दराची अनिश्चितता कायम असते.
- त्यातच चांगला टोमॅटो बाजारात विकला जावा यासाठी शेतकरी टोमॅटो लागवडीत स्टेजिंगसाठी लाखो रुपयांचा खर्च करतात. विक्री केलेल्या टोमॅटोतून झालेला खर्चदेखील काही वेळा निघत नाही.
- त्यामुळे माळशेज परिसरातील भागातील शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या लागवडीचे प्रमाण कमी केले होते. पण, गेल्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाल्याचे चित्र सगळीकडे दिसताच पुन्हा बंद असणाऱ्या लागवडी सुरू झाल्या आहेत.