कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहेच; परंतु, या अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनावरसुद्धा विपरीत परिणाम होणार आहे. आंबा उत्पादक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात; परंतु, उत्पादन हे निसर्गावर अवलंबून असते. संपूर्ण कोकणापैकी आंब्याचे उत्पादन जास्त अलिबाग तालुक्यात घेतले जाते.
हंगामात साधारणपणे दोन लाखांहून अधिक पेट्या वाशी मार्केटमध्ये जात असतात. थंडी सुरू झाल्यावर आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते; परंतु, वातावरणातील बदलामुळे, अवकाळी पाऊस इत्यादी गोष्टी परिणामकारक ठरत आहेत. कलमांना पालवी फुटली आहे. त्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया उशिरा होणार आहे. आणि ज्या झाडांना मोहोर आला आहे, त्यावर तुडतुडा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होईल.
खर्च वाढणार
रोगांपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणी करावी लागेल. सतत वातावरणातील बदल होऊ लागला तर औषधावरील खर्च न वाढणार आहे.
आंबा झाडांची पालवी थांबली होती ती पुन्हा पालवी येईल. त्यामुळे झाडांना मोहोर साधारणपणे जानेवारी महिन्यात येईल. आणि ज्या झाडांना मोहोर आणि कण पकडला असेल त्यांना पावसामुळे तुडतुडे, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. - डॉ. संदेश पाटील, आंबा उत्पादक शेतकरी, हाशिवरे