Join us

Vasantrao Naik Birth Anniversary : वसंतराव नाईकांना का म्हणतात "शेतकऱ्यांचा जाणता राजा"?

By दत्ता लवांडे | Published: June 30, 2024 7:54 PM

Vasantrao Naik Jayanti : हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती. त्यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी केली जाते.

१ जुलै. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती. त्यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी केली जाते. खरं तर १९७२ च्या दुष्काळात सगळी जनता होरपळत होती, लोकांना एकवेळच्या अन्नाची भ्रांत झाली होती, रोजगार नव्हता, पैसा नव्हता... अख्खा महाराष्ट्र झळा सोसत असताना त्यांची दूरदृष्टी आज महाराष्ट्राच्या शेतीव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास कारणीभूत ठरली.

शेतकऱ्यांसाठी त्यांनी दूरगामी योजना राबवल्या. यामुळे त्यांना "शेतकऱ्यांचा जाणता राजा", हरित योद्धा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शेती, समाजकारण आणि राजकारणातील त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. थोर कृषीतज्ज्ञ, प्रगतशील शेतकरी असणाऱ्या वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे लीलया पेलली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपुत्र आहेत" अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. पेशाने वकील असणाऱ्या नाईकांचा कृषी क्षेत्रातील कामाचा आढावा घेण्यासाठी हा लेखप्रपंच...

(Vasantrao Naik Birth Anniversary Special Article)

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथे वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली. तर १९४१ मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. वकिली करत असताना गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी त्यांनी काम केले‌. त्यामुळे त्यांना सामाजिक बांधिलकी जपणारा वकील म्हणून संबोधले गेले. 

राजकीय कारकीर्दस्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी मध्यप्रदेश, मुंबई प्रदेश येथे अनेक राजकीय काम केले. पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. 

महाराष्ट्र राज्य धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल यासाठी त्यांनी काम केलं. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ हे त्यांचे १९६५ सालचे शब्द जनमानसांत चर्चेचा विषय ठरले. त्यांनी शिक्षण, शेती ,उद्योग, सहकार,सिंचन आणि ग्रामीण विकासाच्याक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवले. रोजगार हमी योजनेची सुरूवात वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नामुळे झाली ही खूप मोठी गोष्ट आहे. देशभरात पहिल्यांदाच चार कृषी विद्यापिठाची स्थापना केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. 

वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी होते. शेती प्रश्नाबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना चांगलीच जाण होती. त्यांनी आपल्या शेतीत विविधांगी प्रयोग केले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. त्यांची कृषी औदयोगीक क्षेत्रातील मोलाची कामगिरी वाखाणण्याजोही आहे. आपल्या कारकि‍र्दीत कित्येक शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ साली तत्कालीन सरकारने घेतला. तेव्हापासून १ जुलै हा दिन शासकीय कार्यालयात कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याला लोकमत अॅग्रोकडून विनम्र अभिवादन...

टॅग्स :वसंतराव नाईकशेती क्षेत्रशेतकरी