Join us

नाशिक जिल्हा खरीप हंगाम : सव्वा लाख मेट्रिक टन खत साठा शिल्लक, तर सव्वा दोन लाख आवटंन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 4:56 PM

नाशिक जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी 02 लाख 20 हजार मेट्रिक टन आवटंन मंजूर झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेध लागले असून कृषी व्यापाऱ्यांनी खताची आवक सुरु केली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यामध्ये मागील वर्षीचा 1 लाख 34 हजार 336 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. तर यंदाच्या खरीप हंगामासाठी 02 लाख 20 हजार मेट्रिक टन आवटंन मंजूर झाले आहे. जिल्ह्यामध्ये दोन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यावर्षी देखील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. असे असले तरी खरीप हंगामाची तयारी व्यापाऱ्यांनी सुरु केली आहे. 

मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात विविध राज्यांकडून रासायनिक खतांची मागणी केली होती. यापैकी शेतकऱ्यांनी वापरलेले खत आणि उपलब्ध शिल्लक खत साठा याचा विचार करून खरीप हंगामासाठी खताचा कोटा मंजूर करण्यात येतो. यानुसार चालू वर्षातील खरीप हंगामासाठी नाशिक जिल्ह्याला 2 लाख 20  हजार 600 टन खताचा साठा मंजूर करण्यात आला आहे. यात युरिया 76 हजार 900 टन , डीएपी 18 हजार 300 टन, एमओपी 2500 टन, एनपीके 96 हजार 400 टन आणि एसएसपी 26 हजार 500 टन खतांचा समावेश आहे. तर मागील हंगामातील खतापैकी 1 लाख 34 हजार 336 मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक आहे. हा साठा यावर्षीच्या हंगामात वापरला जाणार असून नव्याने खताची आवकही सुरु झाली आहे. 

द्रव स्वरूपात युरिया उपलब्ध 

तसेच कृषी विभागाने मागणी केल्यानुसार यंदा खरीप हंगामासाठी नॅनो युरिया 72 हजार 400 बॉटल्स आणि नॅनो डीएपी 58 हजार 600 बॉटल्स उपलब्ध झाल्या आहेत. तर नॅनो युरिया 40 हजार बॉटल्स आणि नॅनो डीएपी 22 हजार 400 बॉटल्स मागील वर्षीचा साठा शिल्लक आहे. नॅनो युरिया वापरण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. पिकांना पाणी देत असताना ठिबकचा वापर केला जात्रो, याच ठिबकच्या माध्यमातून द्रव स्वरूपातील युरिया दिला जातो. यामुळे पिकांना लाभ होत असल्याने खरीप हंगामासाठी नॅनो युरियाची देखील उपलब्धता आहे. 

शेतीच्या मशागतीला सुरुवात 

गतवर्षीच्या खरीप हंगामात उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला; परंतु, यावर्षीच्या खरीप हंगामातून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा बाळगून मशागतीला सुरुवात झाली आहे. ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, पाळी घालणे व रोटाव्हेटरची कामे सध्या सुरु आहेत. पावसाच्या आगमनापर्यंत पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने पहाटे ६ ते सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकरी कामे उरकून घेत आहेत. तसेच सायंकाळी ५ ते ६ या वेळेतही कामे होताना दिसत आहेत. 

"राज्याच्या कृषी आयुक्तांनी नुकतेच प्रत्येक जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरिता रासायनिक खताच आवटंन मंजूर केला आहे. यानुसार नाशिक कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या नाशिक जिल्ह्यासाठी 02 लाख 20 हजार 600 मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे. शिवाय शिल्लक खत साठा देखील असल्याने लवकरच खत उपलब्ध देखील होण्यास सुरवात झाली आहे."

- अभिजित जमदाडे, मोहीम अधिकारी

 

टॅग्स :शेतीनाशिकखतेशेती क्षेत्र