Agriculture News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या 2023- 24 खरीप व रब्बी हंगाममधील (Kharif Rabbi Season) पिक विमा नुकसान भरपाई (crop Loan) अद्यापपर्यंत मिळालेली नाही. जवळपास ११२९ कोटी रुपयांची मंजुरी असून ११ लाख ८८ हजार शेतकरी यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर 31 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई खात्यावर जमा न केल्यास शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी शासन 2023 24 खरीप व रब्बी हंगाममधील पिक विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने काढला होता. मात्र याबाबतचे नुकसान भरपाई काही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळाले नाही. याबाबत नुकसानभरपाई 20 जुलै पर्यंत खात्यावर जमा करण्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी लेखी दिले होते. परंतु अद्याप अनेक शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाहीत. याबाबत २० जून रोजी बैठक झाली त्यावेळी कृषी अधीक्षक बोराळे यांनी जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई 20 जुलैपर्यंत देण्याचे लेखी दिले आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही.
विशेष म्हणजे ११२९ कोटींची मंजूर झालेली रक्कम ही विमा कंपनीची असून अद्याप सरकारकडून मिळणारी ४० रक्कम मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर ना विमा कंपनीची ना सरकारची मदत आली नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून नुकसान भरपाई जमा करण्यासाठी पिक विमा कंपनीला 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत पैसे खात्यावर जमा करण्यात यावेत, अन्यथा 1 ऑगस्ट रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे टाळे ठोकण्याच आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन स्वतंत्र भारत पक्ष , शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीकडून देण्यात आला आहे.
सरकारचा पीकविमा कंपन्यावर कोणताही अंकुश दिसत नाही सरकार फक्त घोषणा करते त्याची अंमलबजावणी होते की नाही याची काळजी घेत नाही शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने कोणतेही काल मर्यादेच बंधन निश्चित करून दिलेलं नाही इथच शेतकऱ्यांची फसवणूक होऊन सरकारी मदतीने पीकविमा कंपन्या कडून शेतकऱ्यांची राजरोस लूट केली जाते आहे.
- नीलेश शेडगे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
कानेगाव येथील शेतकरी जगदीश खरात म्हणाले की, मी मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जवळपास ९ एकराचा पीकविमा काढला होता. त्यावेळी सोयाबीन आणि कापूस लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय सुरवातीला मिळणारा २५ टक्के अग्रीम देखील मिळाला नाही. त्यामुळे सरकारने लागलीच आमच्या खात्यावर नुकसान भरपाई टाकावी. यंदा देखील पीकविमा भरला असल्याचे या शेतकऱ्याने आवर्जून सांगितले.