जळगाव : जळगाव (Jalgaon) येथील ममुराबाद कृषी संशोधन केंद्रातील संशोधकांनी विकसित केलेल्या मूग आणि उडदाच्या वाणांवर केंद्रीय उपसमितीने शिक्कामोर्तब केला आहे. २० टक्के उत्पन्नात वाढीसाठी पोषक असणाऱ्या या दोन्ही वाणांची या समितीने शिफारस केली आहे.
केंद्रीय पीक मानके, नोंदणी व पीक वाण शिफारस उपसमितीची ९२ वी बैठक नुकतीच केंद्रीय सचिव आर. के. त्रिवेदी यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात देशभरातील कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या जळगावच्या संशोधन केंद्रातील डॉ. सुमेरसिंग राजपूत (Dr. Sumersingh Rajput) यांनी विकसित केलेल्या मुगाच्या फुले सुवर्ण आणि उडदाच्या फुलेराजन या वाणांना मान्यता देण्यात आली आहे. या वाणांची जळगाव व अहमदनगर जिल्ह्यांत लागवड केल्यानंतर उत्पन्नवाढीसह अन्य फायदे लक्षात घेऊन या समितीने दोन्ही वाणांना मान्यता दिली आहे.
काय फायदे ?
फुले सुवर्ण : हे वाण उशिरा लागवडीसाठी उजवे ठरते. तसेच वारा-वादळासह मुसळधार पावसात या वाणांचे झाड आडवे पडत नाही. भुरी रोगास प्रतिकारक्षम असल्याने उत्पन्नात २० टक्के वाढ देण्यासाठी हे वाण पोषक असल्याचे दिसून आले आहेत.
फुले राजन : शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी अतिशय प्रतिकारक्षम असे हे वाण आहे. भुरीसह विषाणू व कीटाणूजन्य आजारासाठी प्रतिकारक्षण असलेल्या या वाणाची लागवड केल्यास उत्पन्नात १५ ते २० टक्के वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
विकसित केलेल्या या दोन्ही वाणांची जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत लागवड करण्यात आली. संशोधनानुसार अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने या वाणांचा प्रस्ताव विद्यापीठाने केंद्रीय समितीसमोर ठेवला.
- डॉ. सुमेरसिंग राजपूत, संशोधक, ममुराबाद विज्ञान केंद्र.