Nashik : गेल्या महिन्यात चांगलाच भाव खाणारी कोथिंबीर (Coriander) आज कवडीमोल भावाने विकली जात आहे. यामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील विठेवाडी येथील शेतकरी धनंजय बोरसे यांनी सुमारे अडीच एकर कोथिंबीर पिकावर नांगर फिरवला आहे. गेल्या महिन्यात १० किलोच्या कोथिंबिरीच्या क्रेटला सुमारे १५० ते २०० रुपये दर मिळत होता. आज चक्क ५० रुपये क्रेटने विकली जात आहे.
देवळा तालुक्यातील (Deola) विठेवाडी येथील शेतकरी धनंजय अशोक बोरसे यांनी सुमारे अडीच एकर क्षेत्रांत कोथिंबीर पीक घेतले. गेल्या महिन्यात कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. कोथिंबिरीचे पीक ऐन मोक्यावर आल्यावरच बोरसे यांनी सदर पीक काढणीचे ठरवले. यासाठी व्यापाऱ्यांशी सौदाही झाला; मात्र भाव खाणारी कोथिंबीर आवक मार्केटमध्ये वाढल्याने गेल्या महिन्यात भाव खाणारी कोथिंबीर चक्क ५० रुपये क्रेटने (१० किलो) विकली गेल्याने बोरसे यांना हताश होण्याची वेळ आली आहे.
खर्च किती अन् उत्पन्न किती?
जवळपास अडीच एकरवर कोथिंबिर उत्पादनासाठी ४२ हजार ५०० रुपये खर्च आला होता. मात्र या शेतकऱ्याच्या हाती केवळ ७ हजार रुपये आले. उत्पादन खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यावर निम्म्याहून अधिक कोथिंबीर पिकावर नांगर फिरवायची वेळ आली. जर या शेतकऱ्याचा खर्च पाहिला तर कोथिंबीर बियाणे खरेदीसाठी २२ हजार ५०० रुपये, म्हणजेच ७५ किलो बियाणे ३०० रुपये किलोने खरेदी केले होते. निंदणी खर्च १० हजार रुपये, खतासाठी ५ हजार रुपये, इतर खर्च पाच हजार रुपये असा एकूण खर्च ४२ हजार ५०० रुपये तर यातून उत्पन्न केवळ ७ हजार रुपये मिळाले आहेत.
मागील महिन्यात भाव खाणारी कोथिबीर आज कवडीमोल भावाने विकली गेली. मिळालेल्या भावातून खर्चसुद्धा वसूल झाला नाही. यामुळे निम्म्याहून अधिक कोथिंबीर पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आली. यास शासनाचे धोरणच अवलंबून आहे. शेतकयांना अपादन खर्चावर आधारित भाव मिळणे गरजेचे आहे.
- धनंजय बोरसे, विठेवाडी