Agriculture News : मैत्री कुणाची कुणासोबत असावी हे स्वतःच ठरवायचे असते. मैत्री घडवून आणण्यासाठी तिसरा दुवा ठरत असतो. हा दुवा जर चांगला असेल तर मैत्रीचे नाते घट्ट होऊ शकते; कारण एकमेकांची नाळ, एकमेकांचा धागा जोडण्यासाठी कधी कधी तिसऱ्याची गरज असतेच. एका पक्ष्याची दुसऱ्या पक्ष्यासोबत मग एका माणसाची झाडासोबत सोबत का नसावी बरं ? झाडे आमच्याशी मैत्री करा असेही म्हणत नाही. त्यासाठी तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज असते. असेच एक आगळेवेगळे मैत्रीचे नाते गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील शिक्षक संतोष मने हे गेल्या अनेक वर्षांपासून जपत आहेत.
वृक्षामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषला जातो. मानवाला जगण्यासाठी शुद्ध हवा, पाणी, ऑक्सिजन मिळते, पर्यावरणाचा समतोल साधला जातो; परंतु या वृक्षाची मैत्री करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. आयुर्वेदात गुळवेल या वनस्पतीचे नाते कडुनिंबाच्या झाडासोबत किती घट्ट असते आणि त्या नात्याचा गोडवा त्या नात्याचे महत्त्व, त्या नात्याची किंमत सगळ्यांना माहीत आहे.
शेत असो वा शिवार, त्यांनी ५०० कडुनिंबाच्या झाडाखाली गुळवेलाची फांदी लावली. पावसाळ्यात ते कडुनिंबाचे अनेक झाड शोधतात आणि त्या ठिकाणी गुळवेलाची फांदी लावतात. गुळवेल ही अशी वनस्पती आहे की त्याला थोडा जरी ओलावा मिळाला तर त्या ठिकाणी ते झाड उगवते. त्यास हिंदीमध्ये अमृतवेल, असेसुद्धा म्हणतात. अमृतवेल म्हणजेच जिला अमृत मिळून कायम जिवंत राहते, अशी फांदी. गुळवेल आणि कडुनिंबाची मैत्री जपण्याचे काम शिक्षक संतोष मने यांनी केले आहे.
आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व
कडुनिंबाच्या झाडाला जर गुळवेलाची फांदी लागलेली असेल तर आयुर्वेदात त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. हेच मैत्रीचे नाते घट्टपणे जोपासत संतोष मने यांनी गुळवेल या वनस्पतीच्या फांद्या कापून त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच कडुनिंबाच्या झाडाला त्याची मैत्री, मैत्रीण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी गुळवेलाच्या अनेक फांद्या कडुनिंबाच्या झाडाजवळ लावल्या. औषधी वनस्पती म्हणून वापरत होतो. ही वनस्पती विविध आजारांवर अत्यंत गुणकारी आहे.