नाशिक : 'साहेब.. बाजारातील प्रत्येक बारीकसारीक वस्तू दरवर्षी महाग होत असते.. सांगा बरं तुम्ही घरात आणत असलेली एक तरी वस्तूचे भाव उतरले का? अहो मग १९९८ मध्ये तीन हजाराने विकलेला कांदा आज तब्बल २६ वर्षानंतर फक्त ६०० रुपये क्विंटलने विकला जातोय... सांगा साहेब सांगा शेतकरी जगणार कसा असे जाब विचारत वृद्ध शेतकऱ्याने कृषिमहोत्सवातील चर्चासत्रात कांदा पिकावर बोलत असलेल्या अधिकाऱ्याचीच बोलती बंद केली.
जिल्हास्तरीय कृषिमहोत्सवाचे आयोजन दि. १० ते १४ या दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आले आहे. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सत्रात फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांनी भेट दिली. तेव्हा डॉ. मोते यांनी केळी, कापूस, द्राक्ष, कांदा अशा विविध पिकांवर प्रक्रिया करून विविध व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. त्यांचे बोलणे झाल्यावर काही शंका असेल विचारा, असे ते स्वतःच म्हणाले, तेव्हा पहिल्या रांगेत बसलेल्या निफाड तालुक्यातील निवृत्ती चव्हाणके येथील वृद्ध शेतकऱ्यांनी मोबाईल माईक मागितला आणि त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
केली सारवासारव...
कांद्याचे उतरलेले दर, कोणत्याही पिकास नसलेला हमीभाव, केंद्रीय कृषी समितीचा तीनदा सोपस्कार केलेला जिल्हा दौरा अशा अनेक प्रश्नांवर डॉ. मोते यांना वृद्ध शेतकऱ्याने जाब विचारले. मात्र काही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा असतो, असे डॉ. मोते यांनी सांगून तुमच्या भावना सरकारपर्यंत नेऊ अशी सारवासारव केली. पण वृद्ध शेतकऱ्याने साहेब, शासकीय यंत्रणा सरकारला शेतीसंदर्भात चुकीचा आकडा देत असल्याचे सांगितले. सोबत असलेल्या इतर शेतकऱ्यांनीही हीच भावना व्यक्त केली.
प्रक्रिया केलेल्या मालास भाव; पण आमचे काय?
येथे सर्वच अधिकारी म्हणतात, कांदा व इतर फळ पिकांवर प्रक्रिया करून व्यवसाय सुरू करा. पण सर्वच जण हा व्यवसाय करू लागले तर शेतात पिके पिकवणार कोण? प्रक्रिया करून तयार केलेल्या मालाला भाव अन् शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, सांगा साहेब करावे काय, असे विविध प्रश्न उपस्थित करून वृद्ध शेतकऱ्याने जाब विचारला. तेव्हा मात्र सूत्रसंचालकाने या शेतकऱ्याची कशीबशी समजूत काढली.