नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस व जिल्ह्याच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील परिस्थितीच्या अनुषंगाने कृषी क्षेत्रासाठी प्राथमिक सल्ला देण्यात आला आहे.
खरीप भात, नाचणी, वरई, कांदा, भाजीपाला व इतर खरीप पिके
अवस्था : पुनर लागवड रोप अवस्था वाढीचे अवस्था
परिणाम : मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असते
खरीपभात, नाचणी, वरई व कांदा पिकांच्या पेरणी/ पुनर्लागवड केलेल्या क्षेत्रातील पाणी साचले असल्यास त्वरित बाहेर काढणे गरजेचे आहे. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. त्याकरिता पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पध्दतीने चर काढावेत. पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येईल. भात पिकाच्या योग्य वाढीकरिता व अधिक उत्पादना करीता भात खाचरात पाण्याची योग्य पातळी राखणे आवश्यक आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी ठेवावी. जसे कि रोपे लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत १ ते २ सेमी आणि रोपांच्या प्राथमिक वाढीच्या कालावधीत पाण्याची पातळी २ ते ३ सेमी असावी.
द्राक्ष, डाळिंब व आंबा पिकासाठी
द्राक्ष व डाळिंब बागांमध्ये पाणी साचले असल्यास ते बागे बाहेर काढणे आवश्यक आहे. त्याकरिता पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पध्दतीने चर काढावेत. पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येईल.
पशुधनासाठी : नवजात वासरांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यास तसेच दूध उत्पादन कमी तसेच जनावरांच्या शरीर विज्ञानावर प्रभाव होत असल्यास....
पावसापासून पशुधन व कुक्कुटपक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक / ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे. दुभत्या जनावरांना गोठ्यात ठेवा
गुरे व शेळ्यांना शेडमध्ये ठेवा आणि त्यांना पावसापासून वाचवण्यासाठी कोरडे अंथरूण (गोणपाटइ.) द्या.
पावसाळ्यात जमीन ओली, भुसभुशीत झाल्यामुळे जनावर घसरून त्यांना इजा होऊ शकते. दगड व माती खुरांमध्ये जाऊन बसल्यामुळे जनावरांना जखमा होतात यासाठी खुरांची नियमित तपासणी करावी. पावसाळ्यात ओलसरपणामुळे खूर खराब झाल्यास त्या वेदनामुळे दुभत्या गाई म्हशीच्या उत्पादनावर परिणाम होतो.
संकलन : प्रादेशिक, हवामान पूर्वानुमान केंद्र मुंबई, सह विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी ग्रामीण मौसम सेवा केंद्र इगतपुरी.