Join us

कृषि विभागाची कामे एकाच छताखाली, नाशिकच्या दिंडोरीत कृषी भवन उभारणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 3:58 PM

दिंडोरी तालुक्यात कृषी भवन इमारत उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील सर्व प्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यात कृषी भवन इमारत उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी अथवा इतर कृषी कामासाठी सोयीस्कर होणार आहे. 

कृषि विभागाची अनेक कार्यालये इतरत्र विखुरलेली असतात. जिल्हा स्तरावरील तसेच, तालुका स्तरावरील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीमध्ये असणे, कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे. कृषि विभागाचा लोकसंपर्क लक्षात घेता, विविध विभाग विखुरले गेल्याने प्रशासकीयदृष्ट्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोईचे नाही. शिवाय कार्यरत असलेल्या कार्यालयांसाठी मोठया प्रमाणावर परीरक्षणापोटी निधी दयावा लागतो. त्यामुळे खर्चही वाढत जातो. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याने, एकाच छताखालील अद्ययावत कृषिसंकुल बांधणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कृषि विभागातील, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, दिंडोरी व मंडळ कृषि अधिकारी, वणी, उमराळे आणि दिंडोरी, जि. नाशिक या कार्यालयांकरीता, कृषिभवन इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी दहा होती रुपयांचा निधी मान्यता देण्यात आली आहे. 

कृषि आयुक्तालय पुणे येथून प्रस्ताव.. 

कृषि आयुक्तालय, पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, दिंडोरी, जि. नाशिक येथे, कृषि भवन इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार तालुका कृषि अधिकारी कार्यालय, दिंडोरी, जि. नाशिक सह मंडळ कृषि अधिकारी कार्यालय वणी, उमराळे व दिंडोरी यांसाठी कृषि भवन इमारत बांधण्याकरितादहा कोटी इतक्या रक्कमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. प्रस्तावित कामाचे खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 2024-25 या वर्षाला 400 लक्ष आणि 2025-26 या वर्षाला  600 लक्ष  असा एकूण 1000 लक्ष रुपये म्हणजेच दहा कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. 

अशा आहेत सूचना.. 

अ) काम सुरु करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा, तसेच, विस्तृत नकाशास ही प्रशासकीय मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे. 

ब) काम सुरु करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा, तसेच, विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजुरी घेऊनच काम सुरु करावे.

क) ढोबळ स्वरुपात धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करुनच काम हाती घ्यावे.

ड) काम सुरु करण्यापूर्वी सर्व संबंधित स्थानिक संस्था/प्राधिकरणे यांची मान्यता घेण्यात यावी.

इ) काम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची पूर्तता करुनच निविदा प्रक्रिया हाती घ्यावी. 

 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीनाशिकदिंडोरीशेती क्षेत्र