वर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली असून ज्या शेतकऱ्यांना रेशीम शेती आणि तुती लागवडीची माहिती घ्यायची असल्यास प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांची निवड करून रेशीम शेती आणि तुती लागवड प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर इच्छुक शेतकऱ्यांना संबंधित विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रेशीम कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती आहे. या शेतीला चालना देण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि बैंक ऑफ इंडियाच्या संयुक्त वतीने कारंजा येथे 'रेशम कोष उत्पादक उद्यमी' (रेशीम शेती तुती लागवड) या विषयावर फेब्रुवारी महिन्यात १० दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. कारंजा व आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) आणि आष्टी तालुक्यातील नवीन नोंदणीकृत शेतकरी व भविष्यात रेशीम उद्योग करण्यास इच्छुक तसेच शेजारच्या गावातील लोकांसाठी ज्यांना रेशीम शेती करण्याची इच्छा आहे अशांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या भागातील पुरुष किंवा महिला ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांची वयोमर्यादा १८ ते ४५ आहे, असे प्रशिक्षण घेण्यास पात्र राहतील. प्रशिक्षणादरम्यान जेवणाची व्यवस्था मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारे कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कारंजा व आष्टी तालुक्यातील शेतकरी कारंजा येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५:३० या वेळेत येऊन प्रशिक्षण घेऊ शकतात. इच्छुकांनी अर्ज करून नोंदणी निश्चित करावी. प्रशिक्षणाकरिता केवळ ३५ जागांसाठी प्रवेश असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला, पॅन कार्ड किंवा मतदार कार्ड, ४ पासपोर्ट फोटो तसेच उमेदवार बीपीएल कुटुंबातील असल्यास प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी समन्वयक प्रांजली लांडगे, योगिता खैरे, माधव आहे, संचालक उदय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.