वर्धा :रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकाच्या पेरण्या (Harbhara Sowing) सुरू आहेत. यंदा मुबलक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ३० हजार हेक्टर क्षेत्र पाण्यासाठी नियोजन आखले असून, त्याअनुषंगाने पाण्याची सोडत करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत कालव्यातून पाणी सुरू राहणार असून, मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यंदा रब्बी हंगामात (Rabbi Season) १ लाख ५६ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक १ लाख १० हजार ५०० हेक्टरवर हरभरा, त्यापाठोपाठ ४१ हजार ५०० हेक्टरवर गहू, तर २५०० हेक्टरवर रब्बी ज्वारी (Rabbi Jwari) पिके आहे. यापैकी बहुतेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असून, जिल्ह्यातील काही भागात परतीचा पाऊस झाल्याने रब्बीच्या पेरण्या लांबल्या आहेत.
जिल्ह्यात कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने नियोजन आखले असून यंदाच्या रब्बी हंगामात ३० हजार हेक्टर शेताला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कालव्याने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून झालेल्या मागणीनुसार पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जलायश शत-प्रतिशत
यंदा जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसामुळे लहान, मोठे सर्वच जलाशय तुडुंब भरले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी, औद्योगिक वसाहतीची मागणी वगळता शेती सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना मागणी- नुसार पाण्याचा पुरवठा केला जाणार असून, पाणीवापर संस्थेच्या वतीने पाण्याची मागणी करण्याचे आवाहन सिंचन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
आतापर्यंत १२१ पाणीवापर संस्थांची नोंदणी झाली आहे. १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडतीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता एक दिवस आधी पाणी सोडण्यात आले आहे. यंदा ३० हजार कोरडवाहू क्षेत्र सिंचन करण्याचे नियोजन आखले आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
- रविशंकर हरिणखेडे, कार्यकारी अभियंता, कालवे विभाग, वर्धा