Join us

Agriculture News : यंदाही कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका मागेच, जिल्हा बँकेने किती वाटले कर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 4:32 PM

Agriculture News : नंदुरबार जिल्ह्यात पीक पेरण्या पूर्णत्वास येत असताना पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची फिरफिर मात्र कायम आहे.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) पीक पेरण्या पूर्णत्वास येत असताना पीक कर्जासाठी (crop Loan) शेतकऱ्यांची फिरफिर मात्र कायम आहे. राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना साधारण ६०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये १६ टक्क्यांपेक्षा अधिकचे कर्ज वाटप करून शकलेल्या नसल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्याचे पीककर्ज वाटपाचे यंदाचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात यंदा २ लाख ७३ हजार हेक्टरवर खरीप पिकांचे  (Kharif Crops) नियोजन करण्यात आले होते. यापैकी २ लाख ७० हजार हेक्टर पेरण्यांचा टप्पा पार करण्यात आला आहे. पेरण्यांचा आकडा वाढत असताना शेतकऱ्यांना शेतीपिक संवर्धनासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. हाती असलेल्या रकमेच्या बळावर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. यासाठी काहींनी कर्जदेखील काढले होते. बँक किंवा सोसायटीकडून कर्ज मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांच्याकडून कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. यात गेल्या आठवड्यापासून शेतकरी बँकांच्या चकरा मारत आहेत. परंतु राष्ट्रीयीकृत बँका (nationalized banks) कर्ज देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. मागील बोजा उतरवणे, सातबारा दुरुस्ती यासह विविध कागदपत्रे देऊन बँका कर्जाचे प्रस्ताव स्वीकारत नसल्याचे चित्र आहे.

पीक विमा काढण्यावरही परिणामशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत गेल्या वर्षापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत (Pik Vima Yojna) एक रुपयात पीक विमा भरण्याची सुविधा दिली आहे. पूर्वी बँकेतील कर्जातून विमा करण्यावर भर दिला जात होता. परंतु हा विमा ऐच्छिक करण्यात आला आहे. याचा परिणामही बँकांकडून होणाऱ्या कर्ज वितरणावर झाल्याचे वास्तव चित्र आहे. बँकांकडून विमा घेतला नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जिल्ह्यात आज अखेरीस ८३ हजार ५१९ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. बँकांनी कर्ज वितरणात पुढाकार घेतल्याने पीक विम्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज वाटपाची स्थिती दयनीय असताना दुसरीकडे जिल्हा बँकेची गाडी मात्र सुसाट सुटल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे. जिल्हा बँकेने १३४ कोटी रुपयांचे पीक कर्ज गत आठवड्यापर्यंत वितरीत केले आहे. राष्ट्रीय बँकांपेक्षा १९ टक्के अधिकचे कर्जवाटप या बँकेने केले आहे.

जिल्हा बँकेकडून ११९ टक्के कर्ज वाटपजिल्हा बँकेने यंदाच्या हंगामात आजअखेरीस १३४ कोटी ७१ लाख ७८ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील ९ हजार ६५३ शेतकऱ्यांना हे कर्ज देण्यात आले आहे. यातून १६ हजार ४८० हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. नंदुरबार तालुक्यात ३ हजार १८३ शेतकऱ्यांना ४६ कोटी १० लाख, शहादा तालुक्यात ४ हजार ५०२ शेतकऱ्यांना ६६ कोटी ३७ लाख, तळोदा तालुक्यात ३७९ शेतकऱ्यांना ६ कोटी १२ लाख, अक्कलकुवा ९९ शेतकऱ्यांना १ कोटी २२ लाख, नवापूर ६८५ शेतकऱ्यांना ६ कोटी ५४ लाख तर धडगाव तालुक्यात ८०५ शेतकऱ्यांना ८ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. बँकेने ११९ टक्के कर्ज वाटप केल्याची माहिती देण्यात आली आहे. बँकेसोबत निगडीत २२१ विविध कार्यकारी संस्थांनी पीक कर्जवाटपात पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रीयकृत बँकांच्या नकाराने शेतकरी त्रस्तजिल्ह्यात १ लाख १३ हजारपेक्षा अधिक शेतकरी वेळोवेळी राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतात. यात ५६ हजार पेक्षा अधिक शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार आहेत. या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील १२ राष्ट्रीयकृत बँकांच्या ११० पेक्षा अधिक शाखांमधून कर्ज पुरवठा करण्यात येतो. पीक कर्ज वितरण एप्रिल ते मे दरम्यान सुरु करणे आवश्यक असताना बँकांकडून जूनमध्ये उद्दिष्ट्य घेत ऑगस्टपर्यंत कर्ज वितरणाबाबत चालढकल करण्यात येते. यंदाही सारखीच स्थिती असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. यातून बँकांनी ५६ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज जिल्ह्यात वाटप केलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. लीड बँक तसेच जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत पीक कर्ज वाटपाबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आदेश असतानाही योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

टॅग्स :पीक कर्जशेतीशेती क्षेत्रनंदुरबार