जळगाव : अवकाळी पाऊस, गारपिटीसह अन्य नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यशासनाने भरपाईची ४०४ कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यातील २८० कोटींच्या भरपाईची रक्कम २ लाख १३ हजार ४१६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र, १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने १६२ कोटींवर भरपाईची रक्कम प्रशासनाच्या तिजोरीतच पडून आहे.
जिल्ह्यातील १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे प्रमाणिकरण केलेले नाही. त्यामुळे शासनस्तरावरून मंजुरी मिळाली असतानाही अनुदानाची रक्कम या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करता आलेली नाही. प्रशासनाने गावस्तरावरील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले. तरीही १२ हजारांवर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याचे उघड झाले आहे.
या तालुक्यांत सर्वाधिक
जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा, अमळनेर व जामनेर या तालुक्यांत अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी ५ हजार ८५४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासनस्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करता आले नाही.
३ लाखांवर शेतकरी बाधित
गत सहा महिन्यांत जिल्ह्यातील ३ लाखांवर शेतकरी बाधित झाले आहेत. पंचनाम्यानुसार त्यांना शासनाने मदत उपलब्ध केली आहे. ३ लाख ३१ हजार ६३४ बाधितांमध्ये सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात आहेत. या तालुक्यांत १ लाख ३ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यात केवळ २५४९ शेतकरी बाधित झाले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान उपलब्ध केले आहे. वारंवार आवाहन करूनही संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या शेतकऱ्यांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करून अनुदानाचा लाभ घ्यावा.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.
तालुकानिहाय केवायसी न करणारे बाधित
तालुका- बाधित- अनुदान
अमळनेर- ७११ ८४००८३०
भडगाव- १४१५ १९२८१०२०
भुसावळ- ३५४ २४४०३९४
बोदवड- ८५१ २९५१३०७
चाळीसगाव-३८८७ ५१८९६८१९
चोपडा- ९० ५५१६९५
धरणगाव- ४४ २१५८२०
एरंडोल- ७९ ५१९६९३
जळगाव- १८६ १५१९८१०
जामनेर- ९०५ ११२३७०७६
मुक्ताईनगर-२०७७ ४५७८६४८५
पाचोरा- ७१२ ४१८९५३९
पारोळा- ६६४ ९२०६१९९
रावेर- ३७१ २५५०९११
यावल- १६२ १३८३३४५
एकूण१२५०८ १६२१३०९४४