Agriculture News : पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. ३० व ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी खूप हलका पाऊस पडण्याची (Light rain) शक्यता आहे. तसेच उर्वरित दिवस हवामान दिवसा उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील. या दिवसात नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik Farmers) सामान्य कृषी सल्ला देण्यात आला आहे.
हवामानावर आधारित कृषीसल्ला नाशिक जिल्ह्यात दि. ३० व ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी हलक्या पावसाची शक्यता असल्याने स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन कापणी / मळणी केलेल्या पिकांना प्लास्टिक / ताडपत्रीने झाकून सुरक्षित जागेवर ठेवावे. खरीप पिकांच्या (Kharif Season) कापणीनंतर रब्बी पिकांचे नियोजन करताना उत्पादनात घट येते, म्हणून पुर्वमशागतीची कामे गरजेनुसार कमीत कमी प्रमाणात करावीत. पिक पद्धती निवडत असता जमिनीचा प्रकार लक्षात घ्यायला हवा. भात कापणी नंतर उतेरा पीक पद्धतीनुसार किंवा उर्वरित ओलाव्यावर वाटाणा, जवस, मसूर, हरभरा, चवळी इ. पिके घेण्यात यावीत.
वेल वर्गीय भाजीपाला पिकातील कीड नियंत्रण
कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका या पिकांवर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
वेल वर्गीय भाजीपाला पिकातील रोग नियंत्रण
काळा करपा, केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी अमिटोक्ट्रॅडीन (२७%) + डायमिथोमॉर्फ (२०.२७% एससी) २ मिली किंवा बेनालॅक्सिल (४%) + मॅन्कोझेब (६५% डब्लूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने करावी. भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल १ मि.ली. किंवा मेप्टिलडीनोकॅप ०.७ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे.
ज्वारी पेरणीपूर्वी
ज्वारी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व पी.एस.बी. कल्चर चोळावे. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ x १२ सें.मी. अंतरावर करावी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.
गव्हाची पेरणी
तर जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर कोरडवाहू क्षेत्रातील गव्हाची पेरणी ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पेरणी २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान करावी. संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी