Join us

Agriculture News : नाशिकला डाळिंब इस्टेट तर परळीत सीताफळ इस्टेट स्थापनेला मान्यता, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 8:10 PM

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, देवळा परिसरातील वातावरण डाळिंब पिकास पोषक आहे.

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) मालेगावजवळ निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर डाळिंब इस्टेट (Pomegranate Estate) तर बीड जिल्ह्यातील मौजे वडखेल ता. परळी येथे 29.50 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 98 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब फळबाग (Pomegranate Fruit) लागवडीखाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, देवळा परिसरातील वातावरण डाळिंब पिकास पोषक आहे. डाळिंब इस्टेट स्थापना करून डाळिंब ज्यूस उत्पादित करणे तसेच डाळिंबाचे दाणे वेगळे करून फ्रोजन करून निर्यातीस चालना देणे, डाळिंब फळ प्रक्रिया साठवण, पॅकेजिंग, मार्केटिंग यासाठी प्रशिक्षण व विस्तार केंद्रास मान्यता देणे या उद्देशाने डाळिंब इस्टेट स्थापना येणार आहे. त्यासाठी 53 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे

बीड जिल्ह्यात (Beed) बालाघाट डोंगर रांगेत मोठ्या प्रमाणात सीताफळाचे उत्पादन घेतले जाते. या परिसरातील वातावरण सीताफळ उत्पादनासाठी पोषक आहे. या परिसरात उत्पादित होणाऱ्या सीताफळावर याच ठिकाणी संशोधन व प्रक्रिया झाल्यास सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याने या ठिकाणी 55 कोटी खर्चाची सीताफळ इस्टेट प्रस्तावित करण्यात आली होती.

या इस्टेट मुळे सीताफळ पिकाची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. तसेच साठवणूक व प्रक्रिया सुविधांचा विस्तार केला जाईल. तसेच निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण कलमे विकसित करण्यासाठी करण्यात येईल. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल. तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढेल, असा विश्वास कृषी मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रशेतीनाशिक