नाशिक : बांबूपासून रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच भूस्खलन रोखण्यासाठी बांबूचा फायदा होणार आहे. बांबूची (Bamboo Cultivation) मुळं माती धरून ठेवतात. मातीची होणारी धूप थांबवण्यास बांबूची मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे बांबू लागवड एक वरदान ठरणार असल्याचे गोदाकाठ भागातील तरुणांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्याने त्याची दखल घेत निफाड तहसीलदारांनी लोकसहभागातून ही मोहीम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पुढाकार घेत गोदाकाठ भागातील गावे, नदीच्या किनाऱ्यावर बांबूची लागवड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बांबू लागवडीसाठी तालुका, कृषी विभाग, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, युवक यांचा लोकसहभाग घेतला जाणार आहे. बांबूपासून रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच भूस्खलन रोखण्यासाठी बांबूचा फायदा होणार आहे. बांबू मुळे माती धरून ठेवतात. मातीची होणारी धूप थांबवण्यास बांबूची मदत होते. त्यामुळे बांबू लागवडीचा विचार सुरू झाला आहे.
मुसळधार पावसाने जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा, गंगापूरसह इतरही धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीसह अन्य नद्या दुथडी भरून वाहत होत्या. पावसाचे पाणी आणि दारणा, गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाण्याला वेग जास्त होता. त्यामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीकाठही तुटले आहेत. त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह हा नागरी वस्तीकडे सरकू लागला आहे. नदीकाठचा धोका वाढू लागला आहे. हीच बाब लक्षात घेऊन बांबू लागवडीचा विषय चर्चेत आला आहे.
नदी किनाऱ्याची झीज थांबू शकेल...
दारणा-गोदावरीच्या संगमापुढील निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागातील दारणा सांगवी, शिंपी टाकळी, सावळी, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, नागापूर, शिंगवे, करंजगाव, गोंडेगाव, कोठुरे, काथरगाव, चापडगाव, मांजरगाव. तर याबाबत निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले की, महापुरामुळे होत असलेल्या नदीच्या किनाऱ्याची झीज बांबू लागवडमुळे थांबू शकेल. प्रशासनाच्या वतीने लवकरच गोदाकाठ भागातील शेतकरी, कृषी विभाग, स्थानिक ग्रामपंचायत यांची एकत्रित बैठक घेत या विषयावर काम सुरू करू.
गोदाकाठ भागात शेतकरी प्रशासनाने एकत्र येत बांबू लागवड ही चळवळ सुरू करावी. शेतकऱ्यांच्या बांधावर कुंपण म्हणून बांबू लागवडीसाठी मनरेगा'तून प्रोत्साहन देऊन यात शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करू. शासनाच्या वतीने हवी ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहे. - पाशा पटेल, अध्यक्ष राज्य कृषिमूल्य आयोग