Join us

Banana Export : आखाती देशांत केळीची निर्यात वाढली, योग्य व्यवस्थापनातून चांगला मोबदला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 4:01 PM

Banana Export : श्रावण महिन्यात केळी अल्प असल्याने केळीला देशासह परदेशातही मागणी वाढताना दिसत आहे.

धुळे : अनेक समस्यांना सामोरे जात आता आपल्या पीक पद्धतीमध्ये बदल करून शेतकऱ्यांनी शेती करायला सुरुवात केली आहे. त्यातच धुळे (Dhule) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीसह परिसरातील शेतकऱ्यांची केळी थेट आखाती देशांत जात आहे. जवळपास पाचहून अधिक देशात केळी निर्यातीला चालना मिळाली आहे. 

श्रावण महिन्यात केळी अल्प असल्याने केळीला देशासह परदेशातही मागणी (Banana Export) वाढताना दिसत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून केळीला चांगली मागणी असल्याने सर्वच छोटे-मोठे शेतकरी हळूहळू केळी पिकाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे केळीची जून ते फेब्रुवारी या हंगामात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असणारे शेतकरी केळी पीक मोठ्या प्रमाणात घेत असून, ब्राह्मणपुरी परिसरातील केळी देशभरासह आखाती देशात निर्यात होत आहे. या परिसरातील बागायतदार शेतकरी केळी बागेकडे वळले आहेत. 

केळीची निर्यात महिन्यात १५ हजार टनांवरशहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करण्यात येत असते. या परिसरातील शेतकऱ्यांचा केळी लागवडीकडे दरवर्षी कल वाढता राहिला आहे. प्रत्येकी शेतकरी सुमारे दहा ते पंधरा एकरहून अधिक क्षेत्रात केळी पिकाची लागवड करीत असून हजारो हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड येथील शेतकरी करतात. ही केळी व्यवस्थित कटिंग करून स्वच्छ धुऊन खोक्यात पॅकिंग करून पाठवली जाते.

ब्राह्मणपुरीसह परिसरातील केळी आखाती देशात जातात. ब्राह्मणपुरी येथील व्यापाऱ्यांच्या मदतीने दरवर्षी एका महिन्यात तब्बल १५ हजार टन केळी विदेशात पाठवली जात असते. भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्लीसह परदेशातील इराक, इराण, ओमेनसह सातासमुद्रापार केळीला अधिक मागणी असल्याने दहा ते बारा देशांत केळी मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

केळी उत्पादक म्हणतातशेतकरी विजय पाटील म्हणाले कि, कापूस, सोयाबीन या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. सद्यःस्थितीत मिळत असलेल्या भावामुळे लागवड खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेले शेतकरी योग्य नियोजन करून वेळेवर खत व निगराणी करून केळी उत्पादनातून चांगला नफा मिळवत असतात. तर अनिल पाटील म्हणाले की, शहादा तालुक्यासह परिसरातील केळीला विदेशातही मागणी आहे. दरवर्षी येथील केळी विदेशात निर्यात केली जाते. त्यातून लाखोंचा नफा शेतकऱ्यांना मिळत आहे. येथील केळी खायला चवदार असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत असते.  

टॅग्स :शेती क्षेत्रकेळीशेतीधुळे