Join us

Agriculture News : तुमच्याही बँक खात्यातील पैसे थेट कर्ज खात्यात जात आहेत का? जाणून घ्या हे प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 3:10 PM

Agriculture News : काही शेतकरी, महिलांचे पीएम किसान (PM Kisan), लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट कर्ज खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे.

Agriculture News : एकीकडे शासन शेतकरी, महिला वर्गासाठी विविध योजना (Government Scheme) राबवून अनुदान देत असते. मात्र हेच अनुदान बँक खात्यातून थेट कर्ज खात्यात जमा झाल्यास अवघड होऊन बसते. असाच काहीसा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात समोर आला आहे. पीएम किसान (PM Kisan), लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट कर्ज खात्यात जमा केल्याचे समोर आले आहे. शिवाय आरबीआयच्या सर्क्युलरद्वारे योजनांचे पैसे कर्ज खात्यात वळते करून घेतल्याचे बँकाकडून सांगण्यात येत आहे. तर आरबीआयद्वारे असे काही सर्क्युलर काढण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातुन पीएम किसान आणि पीकविमा नुकसान भरपाई, आता लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojan) राबविण्यात येतात. अशा योजनांमधून लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान दिले जाते. यासाठी बँक आधार लिंक, मोबाईल नंबर लिंक अनिवार्य आहे. अशा स्थितीत काही शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या कर्जापोटी बँकाकडून अनुदान मिळाल्यानंतर ते थेट कर्ज खात्यात वळवून घेतले जात असल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यातील अशी शेतकऱ्यांची प्रकरणे समोर आली आहे. 

यातलं एक प्रकरण शेतकरी समिना शेख यांचं आहे. त्या श्रीरामपूर येथील रहिवासी असून त्यांचे एका बँकेत खाते आहे. शिवाय एक वैयक्तिक कर्जही त्यांनी काढले आहे. शेख या पीएम किसानसह लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. झालं असं की, साधारण चार वर्षांपूर्वी त्यांनी एका बँकेतून ३४ हजार रुपयांचे लोन काढले होते. सुरवातीची दोन वर्ष त्यांनी एकही हफ्ता बाउंस झाला नाही. मात्र लॉकडाउनच्या काळात हफ्ते थकले. मात्र यानंतर पुन्हा त्यांनी हफ्ते भरण्यास सुरवात केली. जवळपास मागील चार वर्षांपासून थेट बँकेतून पैसे कट होत असल्याचे त्यांनी सांगितले यात पीएम किसान योजनेचे पैसे, इतरांनी टाकलेले पैसे थेट कर्ज खात्यात वर्ग होऊ लागले. 

समिना शेख म्हणतात की, जवळपास दोन वर्ष एकही हफ्ता बाऊंस झाला नाही. त्यानंतरही हफ्ते भरत गेले. योजनांचे आलेले पैसे थेट कर्ज खात्यात वळते होऊ लागले आहेत. आता लाडकी बहीण योजनेचे आलेले पैसेही कर्ज खात्यात वर्ग करण्यात आले आहे. यावर मी बँकेशी संपर्क साधला असता, आरबीआयच्या नवीन सर्क्युलरनुसार आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले. समिना यांनी थेट संबंधित सर्क्युलरवरील नंबरवर संपर्क केला असता, आरबीआयकडून अशा कोणत्याही प्रकारचे सर्क्युलर काढले नसल्याचे समिना यांना सांगण्यात आले. 

ते सर्क्युलर खोटे.... 

आता संबंधित बँक आरबीआयचे सर्क्युलर दाखवून शेतकरी, महिलांच्या बँक खात्यावरील पैसे वळते करून घेत आहेत. मात्र आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की असं काही सर्क्युलर काढलेले नाही. मग संबंधित सर्क्युलरवर आरबीआयचे संपर्क देण्यात आलेले आहेत. यावर शेख यांनी संपर्क करून याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरबीआय अधिकाऱ्यांनी रीतसर मेल करण्याचा सल्ला दिल्याचे शेख यांनी सांगितले. त्यामुळे आता नेमकी कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मोठा घोटाळा असण्याची शक्यता.... 

स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे म्हणाले की, RBI रिझर्व्ह बँकेच्या GR वरील फोन नंबरवर चौकशी केली असता त्यांनी सांगितले की RBI कडून असे कोणतेही सर्क्युलर अथवा जीआर काढण्यात आलेले नाहीत. नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना व महिलांना जिल्ह्यातील सरकारी बँका हेच सर्क्युलर दाखवून विविध सरकारी अनुदाने कर्ज खात्यात जमा करून शेतकरी व महिलांची राजरोस आर्थिक लूट करीत आहेत. महिला आणि बालविकास त्यांना circular पाठवल्याचे सांगितले जात आहे, त्या आधारावर पैसे वळते करून घेतले जात आहे. याबाबत संबंधित आरबीआय बँकेला रीतसर मेल करून सर्क्युलरबाबत स्पष्टीकरण मागवले असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाबँक