Tomato Grand Challenge : यंदा टोमॅटोला समाधानकारक बाजारभाव (Tomato Market) मिळत असला तरी शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. म्हणूनच टोमॅटो उत्पादन, प्रक्रिया आणि वितरण या टप्प्यामधील येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून टोमॅटो ग्रँड चॅलेंज (tomato Grand Challenge) उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून पुढील काळात टोमॅटो पिकाच्या बाबतीत येणाऱ्या अडथळयांवर मात करता येणार आहे.
केंद्र सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेषी आघाडीच्या सहकार्याने टोमॅटो मूल्य साखळीच्या विविध स्तरांवर नाविन्यपूर्ण कल्पना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी ‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज (टीजीसी) नावाच्या हॅकाथॉनची सुरुवात केली होती. दि. 30 जून 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या टोमॅटो ग्रँड चॅलेंजला (टीजीसी) विद्यार्थी, संशोधनकर्ते, प्राध्यापक सदस्य, उद्योग जगत , स्टार्ट-अप आणि व्यावसायिक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम
संपूर्ण भारतातील नवकल्पकांकडून एकूण 1,376 सूचना प्राप्त झाल्या होत्या. यातील 28 सूचकांना ‘प्रोटोटाइप डेव्हलपमेंट’ आणि मेंटॉरशिपसाठी निधी प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना दिली. जागतिक स्तरावर टोमॅटोचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक असलेला भारत दरवर्षी 20 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन करतो. तथापि, प्रतिकूल हवामान परिस्थिती असताना, म्हणजे अति पाऊस किंवा अचानक अतिकडक ऊन पडणे यांचा परिणाम उत्पादनावर आणि उपलब्धतेवर होतो. त्यामुळे टोमॅटोच्या किमतीमध्ये कमालीचा चढ-उतार होतो. ही आव्हाने थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम करतात.
टोमॅटो ग्रँड चॅलेंज उपक्रम परिणामकारक
तसेच बाजारपेठेतील टोमॅटोची पुरवठा साखळीही विस्कळीत करतात. भाव एकदम कमी झाल्यानंतर अनेकवेळा मोठ्या प्रमाणात टोमॅटो वाया जातात. एकणूच या गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी टोमॅटो ग्रँड चॅलेंज (टीजीसी) आणि टोमॅटो पुरवठा साखळी स्थिर करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि व्यापक उपाय शोधण्यासाठी हा उपक्रम आहे. टोमॅटो ग्रँड चॅलेंज हा उपक्रम यावर परिणामकारक ठरणार आहे. या उपक्रमाच्या परिणामांचा फायदा शेतकरी आणि टोमॅटोचे ग्राहक दोघांनाही होणार आहे.
टोमॅटो पिकापुढील आव्हाने
- पूर्व-उत्पादन : हवामानास अनुकूल बियाण्याचा अल्प वापर आणि खराब कृषी पद्धतींचा वापर
- काढणीनंतरचे नुकसान : शीत गोदाम सुविधांचा अभाव आणि अयोग्य हाताळणी यामुळे नुकसान होते.
- प्रक्रिया आणि मूल्यवर्धन : अतिरिक्त टोमॅटोवर प्रक्रिया करण्यासाठी अपुरी पायाभूत सुविधा.
- पुरवठा साखळी : खंडित पुरवठा साखळी आणि मध्यस्थांच्या वर्चस्वामुळे अकार्यक्षमता आणि किंमतीतील अस्थिरता.
- बाजार प्रवेश आणि मागणी अंदाज : बाजारपेठेत माल आणण्यात सातत्याचा अभाव आणि मागणीचा अंदाज घेण्यासाठी साधनांचा अभाव असल्यामुळे किंमती पडतात आणि अपव्यय होतो.
- तंत्रज्ञानाचा अवलंब : ‘आयओटी’आधारित म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स आधारे देखरेख यांसारख्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मर्यादित जागरूकता
- पॅकेजिंग आणि वाहतूक : टॉमेटो पिकाचे ‘शेल्फ लाइफ’ अर्थात टिकाऊपणा सुधारण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण, किफायतशीर उपायांची गरज.
हेही वाचा ; Tomato Market : पिंपळगाव मार्केटला टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव