Join us

Crop Damage : डोळ्यांदेखत सगळंच वाहून गेलंय, कशाचा पंचनामा करणारं, शेतकऱ्यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 4:25 PM

Crop Damage : अनेक गावांमध्ये शेतीच वाहून नेली आहे. मका, डाळींब, कांदे, केळी बागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

नाशिकजिल्ह्यात परतीच्या पावसाचा (Heavy rain) धुमाकूळ सुरूच आहे. शनिवार आणि रविवारी झालेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे नुकसान केले आहे. अनेक गावांमध्ये शेतीच वाहून नेली आहे. मका, डाळींब, कांदे, केळी बागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता पंचनामे करूच नका, सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. 

नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून शनिवार आणि रविवारी झालेल्या वादळी पावसाने शेतीच (crop Damage) वाहून नेली आहे. अनेक नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतातील माघार पिंक पिके वाहून गेली असून काही शेतकऱ्यांचे तर शेतच वाहून गेल्याचे चित्र आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात ट्रैक्टर, ट्रॉली, शेती उपयोगी अवजारे, विद्युत खांबे, मोटारसायकल आदी वाहून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. 

दरम्यान या पावसात मका, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदे, उन्हाळी कांदा रोपे आदींचे नुकसान झाले. पावसाने हातातोंडाशी आलेल्य घास हिरावून घेतल्याने बळीराजा संकटात सापडला असून, प्रशासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही भागात प्रांताधिकाऱ्यानी भेट देऊन तहसीलदार, महसूलचे तलाठी, तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या नुकसानींची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा संकटात सापडला असून, प्रशासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र पंचनामे न करता थेट सरसकट भरपाई मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. कारण संपूर्ण शेतचं वाहून गेल्याने नेमकं कशाचे पंचनामे करणार? असा सवाल स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. 

परतीच्या पावसाने जवळपास संपूर्ण नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून सोयाबीन, मका, कापूस, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास सर्व पीकेच नष्ट झाली आहेत. राज्यकर्त्यांनी निवडणूक बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यासह नाशिक जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे. - जयदिप भदाणे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक विमापाऊसनाशिक