Agriculture News : राज्यात मागील आठवड्यात सर्वदूर पावसाने(Heavy rain) हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे दिसून आले. सततच्या पावसामुळे उभ्या खरीप पिकात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक असते. नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात ते या लेखातून पाहुयात.
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे (crop damage) नुकसान झाले. सध्या अनेक पिकांची लागवड झाली असून अनेक पिकांची लागवड सुरु झाली आहे. अशातच पावसाने अनेक भागातील पिकात पाणीस साचले आहे. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, उडीद, तुर, भाजीपाला पिकातील साचलेले पाणी क्षेत्रावर बाहेर काढावे. पुढे पडणाऱ्या पावसाचे पाणी शेताबाहेर जाण्याची व्यवस्था करावी.
ऊस पिकावरही साचलेल्या पाण्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी सऱ्या फोडून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. नांगे पडले असल्यास नांग्याच्या ठिकाणी उपलब्धतेनुसार पिशवीतील/ रोग वाटिकेतील रोप वापरून नांगे भरून घ्यावेत. नव्याने लागवड केलेल्या आडसाली उसात अजिबात पाणी साचू देऊ नये. कारण सासलेल्या पाण्यामुळे टिपऱ्या रोपे सडून जाण्याची पर्यायाने ऊस उगवणीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
असे करा उपाय
भात पिकाच्या खाचरातील पाणी बाजूच्या नाल्यात ओढ्यात निचरा होण्याची व्यवस्था करावी. पाऊस उघडल्यानंतर भात पिकास हेक्टरी 40 किलो नत्राची (अमोनियम सल्फेट) मात्रा द्यावी. भाताप्रमाणे इतर पिकांनाही शिफारशी प्रमाणे नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसेच पाण्याबरोबर नत्र वाहून जात असल्याने जमिनीत वापसा येताच हा हप्ता हेक्टरी 25-30 किलो जास्तीचा द्यावा. काही कारणांनी उशिरा लागवड केलेल्या खरीप पिकांच्या पिवळ्या पडलेल्या रोपांवर युरिया /डीएपी 100 लिटर पाण्यात 200 ग्राम खताच्या द्रावणाची पाऊस उघडल्यानंतर फवारणी करावी. त्यामुळे अन्यद्रव्यांची कमतरता भरून निघते आणि रोप जोमाने वाढू लागतात.
लेखक : डॉ. कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .