Agriculture News : पुनर्रचित हवामान आधारित संत्रा फळपीक विमा (Fruit Crop Insurance) नोव्हेंबर २०२३ /२४ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून संत्रा, मोसंबी, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी काढला होता. शासनामार्फत गारपीट नुकसानीचे पंचनामेसुद्धा करण्यात आले होते. परंतु अद्यापही दिवाळी जवळ आली असताना विमा परतावा रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही? असा सवाल शेतकरी करीत आहे.
आंबिया बहरात (Ambiya Bahar) मार्च महिन्याच्या कालावधीत तापमान ४० अंशापेक्षा अधिक एप्रिल व मे महिन्यात तापमान ४५ अंशापेक्षा अधिक राहिले. त्यामुळे संत्र्याचे नुकसान झाले आहे. या नुकसानीनंतर चांदुर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा परताव्यासाठी कंपनीकडे सूचना दाखल केल्या. झालेल्या नुकसानीपोटी (Crop Damage) शेतकऱ्यांचे दावे कंपनीकडून मंजूर करण्यात आले. यावर्षीची झालेली अतोनात संत्रा फळगळ, बुरशिजन्य रोग, गगनाला भिडलेले कृषी निविष्ठाचे भाव अशा विविध प्रकारच्या रोगाने संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
याकरिता शेतकऱ्यांनी आंबिया बहारासाठी वाढीव दराने प्रतिहेक्टर १२ हजार रुपये प्रीमियम भरला आहे. मात्र राज्य व केंद्र सरकारने त्यांचा हिस्सा भरला नसल्याने दावे मंजूर केल्यानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा मिळू शकला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून संत्रा उत्पादक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. हा विमा परतावा मिळाल्यावर शेतकरी पुढील आंबिया बहार नोव्हेंबर महिन्यात विमा काढू शकेल.
सरकार हफ्ता कधी भरणार?
केंद्र व राज्य सरकारने विमा हफ्ता न भरल्याने चांदुर बाजार तालुक्यातील आंबिया बहाराच्या नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना विमा परतावा मिळाला नाही. दुसरीकडे जोपर्यंत राज्य व केंद्र सरकार विमा हफ्ता भरणार नाही, तोपर्यंत परतावे मिळणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक कोंडीत सापडले आहे.
टोल फ्री क्रमांक नावापूरताच!!
योजनेच्या १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवल्या जातात.शासन कंपनीचे प्रीमियम भरण्यात का दिरंगाई करीत आहे? अशा अनेक प्रश्नाचे उत्तर टोल फ्री क्रमांकावरील कर्मचाऱ्यांकडे नाही. परंतु त्या तक्रारींचे कुठलेही समाधान केले जात नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. मागील ४ ते ५ वर्षांपासून संत्रा शेतकरी नापिकीमुळे चिंतेत असून उसनवारी करून यंदाचा विमा काढला होता. परंतु अद्यापही कंपनीने विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नसल्याने पुढील वर्षीचे पीक कसे घ्यावे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्वरित फळ पिक विमा परतावा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांना निवेदन दिले असून दिवाळी पूर्वी विमा रक्कम न भेटल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार आहे.- गोपाल सावरकर, शेतकरी मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांना आंबिया बहार फळपीक विमा परतावा मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी फळ पिक विमा काढण्यास मागे पडत आहे. दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळीचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्या जात आहे. अमरावती जिल्ह्याचे 13 कोटी रुपये केव्हा वाटप होणार हा प्रश्न पडला आहे. दरवर्षी संत्रा मोसंबी ह्याच फळ पिकाचा विमा मिळण्यास विलंब होत आहे. तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. - पुष्पक श्रीरामजी खापरे, जिल्हास्तरीय फळ पिक विमा समिती शेतकरी प्रतिनिधी, अमरावती