नाशिक : बागलाण तालुक्यातील (Baglan) द्वारकाधीश साखर कारखाना (Dwarkadhish Sugar Factory) ऊस दर देण्यास कुठेही कमी पडणार नसून ऊस उत्पादकांना दोन टप्प्यात मोबदला देण्यात येईल. यंदा सहा लाख मॅट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन शंकरराव सावंत यांनी केले. शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश कारखान्याचा २५ वा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना सावंत बोलत होते.
कार्यक्षेत्रातील एकरी १०० टनापर्यंत उसाचे उत्पादन (Sugarcane Production) घेतलेल्या एकनाथ साळवे, कौतिक बोरसे, सुनील सोनवणे, सुनील पाटील, चंद्रेश गावित यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक सचिन सावंत म्हणाले की, उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्यामार्फत बेणे, रासायनिक, सेंद्रिय खते, औषधे आदी निविष्टाचे उधारीने बिनव्याजी वाटप केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढविण्यास मदत झाली आहे.
तसेच कारखान्यामार्फत शासनाच्या धोरणाप्रमाणे साखरेच्या एम.एस.पी मध्ये वाढ झाल्यास त्याप्रमाणे ऊस उत्पादकांच्या मागणीनुसार पंधरा दिवसात पहिला हप्ता देण्यात येऊन जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर दुसरा हप्ता अशा प्रमाणे जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना शंकरराव सावंत म्हणाले की, कारखान्यामार्फत एकरी १०० मे. टनाकडे झेप हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादकांनी घ्यावा. यावेळी शेतकी अधिकारी विजय पगार, संचालक सावंत यांच्या शुभहस्ते उसाने भरून आलेल्या पहिली बैलगाडी व ट्रकचे पूजन करण्यात आले.
ऊस उत्पादकांचा गौरव
जास्तीत जास्त प्रती एकरी ऊस उत्पादन घेणाऱ्या ऊस उत्पादकांना सन्मानित करण्यात आले. तसेच ऊस उत्पादकांना नवीन ऊस जातीचे प्लॉट, खोडवा, निडवाचे प्रात्यक्षिक प्लॉट दाखविण्यात आले असून सेंद्रिय प्रकल्पाची माहिती देण्यात आली.