Join us

Harbhara Sowing : खरिपात साेयाबीन, तर रब्बीत हरभऱ्याचा ‘विदर्भ पॅटर्न’ यंदाही जाेमात! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 8:15 PM

Harbhara Sowing : हरभरा पेरणी क्षेत्रात यंदा गतवर्षापेक्षा सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्राने वाढ दिसून येत आहे.

बुलढाणा : रब्बी हंगामाला (Rabbi Season) सुरवात झाली असून शेतकरी रब्बीच्या पेरणीकडे अधिक लक्ष देऊन आहे. किंबहुना खरिपात झालेले नुकसान दमदार पावसामुळे रब्बीतून भरून निघेल, या आशेवर शेतकरी नव्या जोमाने रब्बीच्या पेरणीत गुंतलेला आहे. यंदाही हरभरा पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा अधिक भर दिसून येत आहे. हरभरा पेरणी क्षेत्रात यंदा गतवर्षापेक्षा सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्राने वाढ दिसून येत आहे.

गतवर्षी रब्बी हंगामात तालुक्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याचा (Gram Sowing) पेरा झाला होता. ताे यावर्षी ५० हजार ३५० हेक्टर इतका राहणार आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाकडून पेरणीचे नियाेजन करण्यात आले आहे. यंदा खरिपात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. काढणीच्या वेळीही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीनचे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.

सध्या बाजारात साेयाबीनला (Soyabean Market) हमीभावापेक्षा कमी दर आहेत. मात्र, समाधानकारक पावसामुळे रब्बीसाठी पाेषक वातावरण असल्याचे पाहून शेतकरी खरिपातील नुकसान रब्बीतून भरून काढण्यासाठी सज्ज आहे. या अनुषंगाने तालुक्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी अपेक्षित आहे. या पिकासाठी पाणी कमी लागते, तर इतर पिकांच्या तुलनेत ते अधिक उत्पन्न देणारे असल्याने हरभरा पेरणी क्षेत्र वाढत असल्याचे चित्र आहे. 

असे राहणार रब्बीचे पेरणीक्षेत्र

तालुक्यातील संभाव्य ६० हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ५० हजार ३४९ हेक्टरवर हरभरा, तर ८ हजार ६०० हेक्टरवर गव्हाचा पेरा राहील. उर्वरित अल्प क्षेत्रावर काही प्रमाणात रब्बी ज्वारी, मका, भुईमूग, तीळ, ऊस, माेहरी, तर काही प्रमाणात सूर्यफुल व करडईचा पेरा अपेक्षित आहे.

हेही वाचा : Kaju Pik Vima : अवेळी पाऊस व गारपीटीने काजू पिकाचे नुकसान झाले तर कसा मिळेल विमा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीसोयाबीनबुलडाणाविदर्भ