Join us

Agriculture News : यंदा धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन, १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 2:38 PM

Agriculture News : यावर्षीच्या खरीप हंगामापासून धान खरेदीची (Paddy Buying) संपूर्ण प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्यात येणार आहे.

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत (Aadiwasi Vikas Mahamandal) आविका संस्थाच्या वतीने केल्या जात असलेल्या धान खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता आणून गैरव्यवहाराला पूर्णतः पायबंद घालण्यासाठी यावर्षीच्या खरीप हंगामापासून धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला असून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली (Gadchiroli) प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, चामोर्शी तालुक्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र धान खरेदी, भरडाईच्या व्यवहारात गैरव्यवहार होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामापासून धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पार पाडण्यात येत आहे. 

यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत जवळपास ५३ केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीकरिता ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. १० ऑक्टोबरपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून १५ नोव्हेंबरपर्यंत अखेरची मुदत आहे. यावर्षीपासून खरेदी, बारदाना तसेच भरडाईची सर्व प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यातील धान खरेदी व इतर कामांची माहिती पाहता येणार आहे. 

४८ तासामध्ये धानाचे चुकारे

आविका संस्थांच्या आधारभूत केंद्रावर धानाची खरेदी होण्यासाठी २५ दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागत होता. काही शेतकयांना तर महिना दीड महिना चुकारे मिळत नव्हते. परिणामी धानाची विक्री केलेले अनेक शेतकरी बँकेच्या चकरा मारून त्रस्त होत होते. यंदा सुरवातीपासून तर शेवटपर्यंतची संपूर्ण प्रकिया ऑनलाइन होत असल्याने संबंधित शेतकऱ्यांना ४८ तासामध्ये धानाचे चुकारे मिळतील, असा दावा महामंडळाने केला आहे. यंदापासून थेट व्यवस्थापकीय कार्यालयातून चुकारे वळते करण्यात येणार आहे.

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीनाशिक