वर्धा : पारंपरिक शेतीत येणारा खर्च शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. याला पर्याय म्हणून लहान आर्वी येथील देवेंद्र गायकी यांनी अर्धा एकरात पपई पिकात आंतरपीक म्हणून झेंडू आणि कांद्याची (Intercropping In Payaya) लागवड केली. बाजारभाव बघता निव्वळ आंतरपिकातून एक लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. यातून त्याना पपई पिकासाठी आलेला खर्च वजा करता पावणेदोन लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.
देवेंद्र गायकी यांनी केलेला प्रयोग यशस्वी झाला असून इतर शेतकऱ्यांसाठी Onion Zendu Farming) प्रेरणा देणारा आहे. त्यांनी एप्रिल २०२४ मध्ये अर्ध्या एकर जमिनीवर ४०० पपई रोपटी लागवड केली. पपईच्या लागवडीमध्ये जागेचा अधिकतम वापर करण्यासाठी ८०० झेंडू व कांद्याचे आंतरपीक घेतले. या पद्धतीमुळे जमिनीचा उत्तम वापर झाला तसेच उत्पन्नाचे विविध स्रोत मिळाले.
कांद्याच्या पीक उत्पादनातून (Onion Farming) ८० हजार रुपये मिळाले आणि झेंडू फुलांच्या विक्रीतून ५० हजार रुपये अतिरिक्त मिळाले. या कमाईमुळे पपईच्या लागवडीवरील संपूर्ण खर्च भरून निघाला. याशिवाय, पपईच्या लागवडीत केलेल्या गुंतवणुकीतून त्यांना भरघोस परतावा मिळाला. त्यांनी एकूण १० क्विंटल पपईची काढणी केली. १ हजार ७०० प्रतिक्विंटल या दराने पपई बाजार विक्री केली. यातून फक्त पपई विक्रीतून एक लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आंतरपिकांच्या विक्रीतून लागवड खर्च वसूल झाल्यामुळे ही रक्कम निव्वळ नफा ठरली.
नफा कायम ठेवण्याचा केला संकल्प
या यशाने प्रेरित होऊन इन्कम प्रवाह सुरू ठेवण्यासाठी भविष्यातील लागवडीसाठी आधीच नियोजन केले जात आहे. जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक शेतीपद्धती अवलंबून पिकांचे फेरपालट करण्याची योजना आखली असून वारंवार पीक फेरबदल करून दरवर्षी नफा कायम ठेवण्याचा संकल्प केला आहे. योग्य नियोजन आणि कार्यक्षम जमिनीच्या वापराने लहान शेतकरीदेखील चांगला नफा मिळवू शकतात आणि आपला उदरनिर्वाह सुरक्षित करू शकतात हे या प्रयोगाने सिद्ध करून दाखविले आहे.
पपईच्या झाडांना फळे येईपर्यंत विविध पिके घेतल्यामुळे, मला जलद परतावा मिळाला. यामुळे इन्कमचा नियमित प्रवाह तयार झाला आणि आर्थिक जोखीम कमी झाली. मिश्र शेतीपद्धतीच्या यशामुळे माझ्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला.
- देवेंद्र गायकी, प्रयोगशील शेतकरी, लहान आर्वी.