नाशिक : महिनाभरापूर्वी परतीच्या पावसामुळे सिन्नरसह (Sinnar) जिल्ह्यातील काही तालुक्यांतील खरीप आणि लेट खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोबतच रब्बी हंगामासाठी (Rabbi Season) शेतात टाकलेल्या उन्हाळी कांद्याच्या रोपांचेदेखील नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत परतीच्या पावसामुळे लाल कांदा शेतातच खराब झाल्याने जायगाव येथे एक एकर पिकावर शेतकऱ्याने रोटाव्हेटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे.
मागील वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे पुरेसे उत्पादन घेता न आल्याने नुकसान झाले होते. दुष्काळी परिस्थितीतही पिकवलेल्या कांद्याला थोडासा चांगला बाजारभाव मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये कांदा निर्यातबंदी केल्यानंतर त्याचा परिणाम बाजारावर झाला होता. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील खराब झालेल्या कांद्यावर रोटर फिरवला आहे.
सद्यस्थितीत कांद्याला समाधानकारक बाजारभाव (Kanda Bajarbhav) असला तरीही लेट खरीप कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा करावा लागत आहे. या पावसात लाल कांद्यावर देखील परिणाम झाला. म्हणूनच बाजारभाव टिकून आहेत. काही ठिकाणी तर कांदा पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांवर अशा प्रकारे रोटाव्हेटर फिरवण्याची नामुश्की आली आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांवर मात करून शेतकरी मोठ्या कष्टाने कांदा पिकवतात. अशावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर मिळाल्यास सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. पुढील काही दिवसात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे काढून टाकावे.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना
हेही वाचा : Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजारात कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव