- सूरज पाटील
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) बोथबोडन गावात २००३ ते २०२१ या १८ वर्षात सर्वाधिक ३० शेतकरी आत्महत्या झाल्या. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. मात्र, गावाने सिंचनावर लक्ष केंद्रीत केले. तलाव व विहिरींमुळे शेती सिंचनाखाली आली. सोबतच शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायावर भर दिला. यामुळे मागील तीन वर्षात गावात एकही शेतकरी आत्महत्या झाली नाही. शेतकऱ्यांनी संघर्षाला कष्टाची जोड दिल्याने गावात आता समृद्धीचे पीक येत आहे.
दरवर्षीच शेतकरी आत्महत्या (farmers Suicide) होत असल्याने सरकारचे या गावाने वेधून घेतले होते. गावात मंत्री, नेत्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. १,७९६ लोकसंख्येच्या गावात तीन ते पाच एकर शेती असणान्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. नापिकीमुळे त्यांच्या हातात काहीच उरत नव्हते. २००३ मध्ये विनोद राठोड या शेतकऱ्याने पहिली आत्महत्या केली. त्यानंतर शेतकरी आत्महत्येचे सत्रच सुरू झाले. २०२१ मध्ये विलास राठोड या शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.
आईवडिलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी तारेवरची कसरत, ही प्रमुख कारणे त्यामागे होती. घरातील कर्ता पुरुष शेताकडे निघाल्यावर तो सुखरूप घरी येणार की नाही, ही चिंता महिलांना स्वस्थ बसू देत नव्हती. मात्र, गावाने सिंचनावर लक्ष केंद्रीत केले. गावाला लागून अर्जुना तलाव, मनपूर तलाव, गहुली हेटी तलाव उभा राहिला त्यानंतर दोन पाझर तलावही बांधले गेले. कृषी विभागाच्या योजनेतून शेतकऱ्यांना कृषिपंप, पाइपलाइन, इंजिन मिळाल्याने शेती सिंचनाखाली आणली गेली. त्यामुळे आता येथील शेतकरी बारमाही पिके घेऊ लागली आहेत.
शेतकरी महिलेने सावरले कुटुंब, मुलगाही नोकरीला गावातील शंकर सूर्यभान वाघमारे या शेतकऱ्याने २००५ माये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शांताबाई यांच्यावर आभाळच कोसळले. मोठी मुलगी रंजना सातवीत, प्रवीण इयत्ता तिसरीत तर लहान दिलीप पहिलीत शिक्षण घेत होता. त्यांच्या भविष्याचा प्रश्न उभा होता. शेतकरी महिला शांताबाई यांनी स्वतः शेती कसायला सुरुवात केली. शासकीय मदतीतून दोन दुधाळ जनावरे, विहीर व इंजिन मिळाले. यामुळे कोरडवाहू शेती सिंचनाखाली आली. आता त्या तूर, सोयाबीन, गहू हे उत्पादन घेतात. प्रवीण हा राज्य परिवहन मंडळात चालक म्हणून कोल्हापूरला नोकरीला लागला. तर, मुलगी रंजना अंगणवाडी सेविका आहे. लहान दिलीप शेती करतो.
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलगा तलाठी सीताराम भुराजी दुमारे या अल्पभू धारक शेतकयाने २०१२ मध्ये आत्महत्या केली होती. त्यांचा मुलगा नागोराव दमारे यांनी रोजमजुरी करून कुटुंबाला सावरले, नागोराव वांचा मुलगा सतीश याने वडिलांना हातभार लावण्यासाठी प्रसंगी शेतात मजुरीचे काम केले. परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण घेतले पाहिजे. याच जिद्दीने बीएसस्सीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्याच्या कठोर मेहनतीला फळ आले असून एकाचवेळी वनरक्षक आणि तलाठी पदाची परीक्षा पास झाला.
एक हजार लिटर दुधाचे उत्पन्न शेतीसोबतच शेतकयांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. गावात २०० पेक्षा जास्त म्हशी आहेत. यातून एक हजार लिटर दुधाचे उत्पन्न होत आहे. दुधाळ जनावरांमुळे पशुपा- लकांच्या हातात पैसाही खेळत आहे. कधीकाळी कुड़ा मातीच्या घराचे रूपडे आता पालटत आहे.
रेल्वेच्या कामानेही मिळाला रोजगार बोथबोडन शिवारात २०१८ पासून वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. गावातील तरुणांना चालक, सुरक्षारक्षक, तर महिलांना स्वयंपाकी म्हणून रोजगार मिळाला. जवळपास ५० जण या कामावर राबत आहेत. या बरोबरच काही जणांनी भाजी विक्रीसाठी यवतमाळ गाठले आहे. तेथे हे तरुण दररोज भाजी विक्री करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. या बरोबरच इतर उद्योगातही अनेकजण कामाला लागल्याने गावातचे चित्र पालटले आहे.
युवक लावतात कुटुंबाला हातभार २००३ पासून गावात शेतकरी आत्महत्येला सुरुवात झाली. २००५ मध्ये सर्वाधिक एकामागून एक सात जणांनी जीवनयात्रा संपविल्याने प्रशासनासह गावकरी हादरले होते. मात्र, शेती सिंचनाखाली येत गेल्याने आता चित्र बदलत आहे. १० टक्के शेती सिंचनाखाली आली. शेतकरी बारमाही पीक घेत असून, दुग्ध उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत आहे. गावातील युवक कोणते ना कोणते काम करून कुटुंबाला हातभार लावत आहे. - अनुप चव्हाण, माजी सरपंच, बोथबोडन