नाशिक : जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर व डिसेंबर 2024 या कालावधीत अवकाळी पावसामुळे (Avkali Paus) झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर बाधित शेतकरी यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे.
या अनुषंगाने ज्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.
प्रशासनामार्फत जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर व डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
ज्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे, असे श्री. वाघ यांनी कळविले आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण (E-KYC) केलेले नाही त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी करून घ्यावे.
उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक अद्ययावत नाही, त्यांनी आधार क्रमांक तत्काळ अद्ययावत करून घेवून बँक खाते देखील आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावेत. जेणे करून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतीपीक नुकसानीची रक्कम जमा करणे शक्य होईल, असेही निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी कळविले आहे.