Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेकडून (Nashik District Bank) सातत्याने शेतकऱ्यांना नोटिसां देण्यासह जमिनींचे लिलाव करण्याचे काम सुरू आहे. आज नांदगावसह निफाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव होते, मात्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे लिलाव स्थगित करण्यात यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव (Land Auction) सुरु असून जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.
नाशिक जिल्हा बँक प्रशासनाने नांदगावसह (Nandgoan) निफाड तालुक्यातील ९ शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव ठेवले होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बाजून ताकदीने उभ्या राहणाऱ्या शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना आधार देत एकवटण्याचे आवाहन केले. त्यानुसार शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकजुटीचे दर्शन घडवत लिलाव स्थगित करण्यास प्रशासनाला भाग पाडले. नांदगावसह निफाड तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव नांदगाव तालुका आणि निफाड तालुका जिल्हा बँक शाखेच्या वतीने तालुका विभागीय कार्यालयात जाहीर केले होते. या संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी संघटना समन्वय समितीने विभागीय कार्यालयात जाऊन विभागीय वसुली अधिकारी मांगीलाल डंबाळे यांच्याशी समिती अध्यक्ष भगवान बोराडे आणि मराठा क्रांतीचे नानासाहेब बच्छाव यांच्या मध्यस्थी केली. यावेळी नांदगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळणे गरजेचे असल्याचे संघटनेने नमूद केले.
शेतकऱ्यांचा सवाल
अनेक दिवसांपासून शेतकरी समन्वय समितीचे आंदोलन सुरु आहे. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव होऊन बँकेने जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. अशात आज देखील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनी लिलावाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी 'ज्यांनी बँक लुटली त्यांच्या जमीनींचे लिलाव अगोदर करा, आमच्या जमिनीवर करत असलेल्या कारवाया आम्हाला मान्य नाही. शेतीचे लिलाव करण्याचा अधिकार बँकेला नाही, असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी केला.