Agriculture News : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत (Saur Krushi Pump Yojana) राज्यातील शेतकऱ्यांना सोलर देण्यात येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र आता भूमिपुत्र संघटनेकडून याबाबत भूमिका घेण्यात आली आहे. त्यानुसार कृषी पंपांना वीजजोडणीसाठी सोलारची (Solar Panel) पूर्णपणे सक्ती नको, अशा आशयाचे निवेदन या संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
काय म्हटलंय निवेदनात
महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी पंप बीज जोडणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांनी वीज जोडणी अर्ज करून कोटेशन भरून ठेवलेले आहेत. अशा वीज ग्राहकांना महावितरणकडून सोलरची सक्ती केली जात आहे. नवीन वीज कनेक्शनसाठी सोलर व्यतिरिक्त महावितरणने वीज जोडणीचे पोर्टल बंद करून ठेवलेले आहेत. शेतकऱ्यांना सोलर व्यतिरिक्त इतर पर्याय बंद केल्यामुळे सोलर मधून कायम योग्य दाबाची वीज मिळत नाही.
तुषार, ड्रीप आणि लांब पर्यंत उपसा करून पाईप लाईनद्वारे योग्य दाबाने पाणी मिळत नाही. वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीत पिकांना पाणी देत असतांना शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो. करिता राज्यामध्ये पूर्णपणे सोलरची सक्ती न करता वीज जोडणीसाठी जुन्या विद्युत प्रवाह पद्धतीचा सुद्धा पर्याय ठेवावा, अशी विंनती या निवेदनातून करण्यात आली आहे.
सरकारने सोलारची सक्ती करू नये. सोलार मधून कायम योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळत नाही. सोलार सोबत पारंपरिक विदयुत प्रवाहाचा पर्याय उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. सिंचनसाठी तुषार, ठिबक, पाईप लाईनद्वारे लांब उपसा करत असतांना प्रत्यक्षात अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत. वातावरणात सतत होणारे बदल लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना पारंपरिक व अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारचा वीज पुरवठा दिला पाहिजे.
- विष्णुपंत भुतेकर, संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र, शेतकरी संघटना