Join us

agriculture News : मन्याड धरणातून रब्बीसाठी 15 डिसेंबरनंतर पहिले आवर्तन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 2:30 PM

Manyad Dam : मन्याड धरणातून (Manyad Dam) रब्बीसाठी 15 डिसेंबरनंतर पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : मन्याड परिसरातील (Manyad Dam) २२ हून अधिक गावांना नवसंजीवनी ठरणारे मन्याड धरण यावर्षी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओव्हरफ्लो झाले. या धरणातूनरब्बीसाठी १५ डिसेंबरनंतर पहिले आवर्तन सोडण्याचा (Water Discharged) निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच कालव्याचे कामही लवकरच हाती घेणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

यावर्षी मन्याड धरण (Manyad Dam) १०० टक्के भरल्याने रब्बी हंगाम घेण्यासाठी (Rabbi Season) मन्याड धरणातून कधी व किती आवर्तन सोडण्यात येणार, यावर विचारविनिमय करण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता मन्याड शाखा टाकळी प्र. दे. येथे गिरणा पाटबंधारे उपविभागीय अभियंता विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला आडगाव, टाकळी प्र. दे, पिंपळवाड म्हाळसा, शिरसगाव, देवळी, डोणदिगर, भोरस, अलवाडी, देशमुखवाडी, सायगाव, पिंप्री येथील शेतकरी उपस्थित होते. 

यावर्षी खरीप हंगाम (Kharif Season) पावसाळ्याअभावी थोडा लांबणीवर गेल्याने शिवाय अजून थंडीचे प्रमाणदेखील कमी असल्याने खरिपात लागवड केलेले कपाशी पीक शेतातून काढण्यासाठी उशिर होणार आहे. १७५ डिसेंबरऐवजी २५ डिसेंबर किंवा १ जानेवारीनंतर पहिले आवर्तन सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती; परंतु या मागणीला काही शेतकऱ्यांनी विरोध करत पाणी जास्त लांबणीवर जाईल, म्हणून १५ डिसेंबरनंतर सेक्शन क्रमांक २ साठी पाणी सोडण्याचे बैठकीत ठरले. यावर्षी किमान तीन आवर्तने मिळण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांना होती; परंतु कालवा नादुरुस्तीमुळे यावर्षीदेखील दोनच आवर्तनावर समाधान मानावे लागणार आहे. 

सांडव्यावरून जाणारे पाणी कुणाला मिळणार? भोरस व डोणदिगर येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मन्याडच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी भोरस धरण व डोणदिगर परिसरातील नदी, नाल्यांना रिचार्ज करण्यासाठी द्यावे, अशी मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाया जाणारे पाणी सोडण्यात आले होते; परंतु अलवाडी, नांदे गावाजवळ दोन ते तीन वेळेस कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले.

हेही वाचा : Paddy Harvesting : पारंपरिक भात मळणीसाठी खळे कसे तयार करतात? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानधरणनाशिकरब्बी