Join us

Agriculture News : संत्रा बागांमध्ये फळगळ वाढली, मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 4:07 PM

Agriculture News : चांदुर बाजार (Chandur bajar) तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरु असल्याने संत्रा, तुर, सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे.

अमरावती : चांदुर बाजार (Chandur bajar) तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरु असल्याने संत्रा, तुर, सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे बँकांचे कर्ज काढून शेती जागवली असताना सद्यस्थितीतील मुसळधार पावसाने संत्रा बागांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या बागांमध्ये संत्राफळांचा सडा पडल्याचे वेदनादायी चित्र अनुभवायला मिळत आहे. 

अमरावती जिल्ह्यातील (Amravati) चांदुर बाजार तालुक्यात शेकडो हेक्टर जमिनीवर संत्राबागा (Orange Farming) उभ्या आहेत. ५ ते ६ वर्षांपूर्वी संत्रा उत्पादनाने शेतकऱ्यांना चांगला पैसा दिला. त्यामुळे सदर पिकाकडे शेतकरी नगदी पीक म्हणून पाहत होते. एकदा बाग तयार झालो की २५ ते ३० वर्षे ते उत्पन्न देत राहते. त्यामुळे कपाशी किंवा अन्य पिकांच्या तुलनेत सदर पीक शेतकऱ्यांना फायद्याचे वाटू लागले होते. त्यामुळे मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संत्रा कलमा लावून बागा तयार केल्या. त्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला; मात्र मागील दीड महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्याने संत्रागळ मोठ्या प्रमाणात होत आहे. 

तात्काळ पंचनामे करण्यात यावेत.... 

संत्रा फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभाग व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना  सरकार मदत करून दिलासा देईल. सदरचे नुकसान लक्षात घेता प्रति हेक्टर प्रमाणेशा सनाने मदत द्यावी. तात्काळ पंचनामे करून मदत उपलब्ध करून बँकांची कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

चांदूरबाजार तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन हे पीक असून पूर्ण पीक पाण्याखाली आहे. पाऊस सतत सुरु असल्याने शेतातून कितीही पाणी काढून दिले तरी पाणी साचून राहू लागले आहे. अशा स्थितीत पिकाला मोठा फटका बसत असून काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांवर परिणाम झाला आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पंचनामे करावेत, असे मत शेतकरी गोकुळ भाकरे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीअमरावतीआॅरेंज फेस्टिव्हलपाऊस