Agriculture News : राज्यातील मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार तीन जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या वारसांना पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे ऊसतोड कामगार महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्याकरिता अपघात विमा देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. नुकतेच सोलापूर, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातील तीन मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना निधी मंजूर झाला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलूर येथील रामेश्वर मोतीराम राठोड यांच्या कुटुंबीयांना तसेच हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथील गोरखनाथ बळीराम राठोड यांच्या कुटुंबीयांना आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धारापुरी येथील लाल यादव नन्नवरे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
दरम्यान या तिन्ही जिल्ह्यातील हे प्रस्ताव मंजुरी करता सादर करण्यात आले होते. परंतु सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ जिल्हास्तरीय समिती यांची मान्यता घेऊन सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते. त्यानुसार सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ जिल्हास्तरीय समिती यांची मान्यता घेऊन मंजुरी देण्यात आले आहे. त्यानुसार आता मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांना हा निधी दिला जाणार आहे.
राज्यातील मयत ऊसतोड कामगाराच्या वारसांकडून प्रस्ताव सादर केले जात आहे. हे प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येत आहेत. त्यांनतर राज्यस्तरावर याला मंजुरी मिळून निधी देण्यात येत आहे.
- सुरेश पवार, अध्यक्ष, तुळजाभवानी कामगार संघटना, धाराशिव