- गोपाल लाजूरकर
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना आत्मनिर्भर केल्यास कुटुंबाचा, पर्यायाने समाजाचा कायापालट होईल. गावखेड्यातही स्वयंरोजगारासह इतरांनाही रोजगार उपलब्ध होईल, हीच बाब हेरून शासनाच्या वतीने जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. याच अभियानातून येथील महिलांनी (Mahila Bachat Gat) शेतीकामासाठी भाडे तत्वावर ट्रॅक्टर देण्यास सुरवात केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव-डोंगरगाव क्षेत्रातील महिलांच्या हाती रोजगार उपलब्ध झाला आहे. या परिसरातील महिलांनी शासनाच्या जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन (Sanitery Napkin) तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. आता ट्रॅक्टर खरेदी करून शेतीकामासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य क्षेत्रासह कृषी क्षेत्रातही उत्पन्नाची साधने शोधली आहेत.
देसाईगंज तालुक्याच्या कोरेगाव-डोंगरगाव क्षेत्रातील स्पंदन महिला प्रभाग संघाअंतर्गत १२ गावे आहेत. यात १४ ग्रामसंघ आहेत. या प्रभाग संघांशी अनेक गावच्या महिला सहभागी आहेत. महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो. त्या अनुषंगाने महिलांनी संधीच सोनं करत गावातच चांगले व्यवसाय उभारले आहेत.
अनुदानावर शेती अवजारे
कृषी अवजारे बँक योजनेतून स्पंदन महिला प्रभाग संघाला अनुदानावर ट्रॅक्टर, रोटावेटर, कल्टिवेटर मिळाले. हे ट्रॅक्टर हाताळण्याची व त्याला काम उपलब्ध करण्याची जबाबदारी शंकरपूर येथील सर्वश्री महिला ग्रामसंघाला देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात खरीप व रब्बी हंगामात शेती कामासाठी ट्रॅक्टरची गरज असते. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शंकरपूर येथील ग्रामसघांला उत्पन्नप्राप्तीची संधी मिळालेली आहे. त्याचा उपयोग कसा होतो, याकडे लक्ष आहे.