Join us

Agriculture News : मागेल त्याला शेततळेच्या धर्तीवर मागेल त्याला क्रॉप कव्हर, द्राक्ष पीक शिबीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 2:15 PM

Agriculture News : सटाणा -नामपूर या ठिकाणी ऍग्रोसोल प्रोडक्ट एलएलपी यांच्या विद्यमाने द्राक्ष पीक प्लॅस्टिक आच्छादन मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

Agriculture News : द्राक्ष हे महाराष्ट्रातील (Grape farming) शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हरची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सटाणा -नामपूर या ठिकाणी ऍग्रोसोल प्रोडक्ट एल. एल. पी. यांच्या विद्यमाने द्राक्ष पीक प्लॅस्टिक आच्छादन मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी द्राक्ष बागायतदार संघ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (MPKV Rahuri) यांच्या समितीने द्राक्ष बागांचे अवेळी होणाऱ्या पाऊस आणि गारपिटीपासून संरक्षणासाठी दक्षतेचा उपाय म्हणून प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानांबाबत शिफारस केलेली आहे. त्यामुळे काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी हे कव्हर आपल्या द्राक्ष शेतीत वापरताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच हे मार्गर्शन शिबीर राबविण्यात आले. यावेळी द्राक्ष बागायत संघाचे कैलास भोसले यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींवर उपाय देणार असल्याचे सांगितले. 

ते म्हणाले कि, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, निर्यात शुल्क कमी करणे, त्याचप्रमाणे बेदाणा शेडसाठी १० लाख अनुदान मिळाले आहे, ते कसे अजून जास्तीत जास्त मिळवता येईल. सध्या ५ व ७.५ एच. पी. पर्यंतचे वीज बिल मोफत आहे, मात्र द्राक्ष बागायतदारांसाठी १० एचपीपर्यंतचे वीज बिल माफ करावे, यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले. त्याचप्रमाणे १०० हेक्टर प्रायोगिक तत्वावर क्रॉप कव्हर अनुदान मंजूर केले. परंतु ते फार कमी शेतकऱ्यांना लाभ देणारे आहे. ते अनुदान ५०० हेक्टरपर्यंत मिळावे. 

मागेल त्याला क्रॉप कव्हर

तसेच राज्यात मागेल, त्याला शेततळे अशी योजना आहे, तशीच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला क्रॉप कव्हर आणि मागेल त्याला, सोलर पंप अशी योजना द्राक्ष बागायतदारांसाठी आणण्यास पाठपुरावा करणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून जो १० टक्के GST घेतला जातो. परंतु त्याच शेतकऱ्यांना त्याचा परतावा मिळत नाही, तरी GST कमी करावा अथवा GST अनुदान द्यावे, यासाठी प्रयत्न द्राक्ष बागायतदार संघ करणार आहे. तरी पुढील द्राक्ष हंगामात बागायतदारांना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जाणार असल्याचे कैलास  भोसले यांनी सांगितले.  

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीद्राक्षेनाशिक