Nashik : माधव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मेहनत घेत द्राक्षाचे (Grape Farming) पीक उभं केलं होतं. पुढील काही दिवसात हे पीक बाजारात देखील येणार होतं. मात्र आता हाता तोंडाशी आलेलं पीक अज्ञातांनी कापून टाकल्याने शेतकऱ्याचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकच्या (Nashik) चांदवड तालुक्यातील शिंदे गावात हा प्रकार घडला आहे.
माधव शिंदे यांचे सुमारे कुटुंब पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. या कुटुंबाकडे पाच एकर शेती असून एक एकर क्षेत्रात यापूर्वीच द्राक्ष लागवड केली आहे. तर इतर क्षेत्रात टोमॅटो, कांदा उत्पादन घेतले जाते. तर उर्वरित एक एकर क्षेत्रात वर्षभरापूर्वी द्राक्ष पिकाची लागवड केली होती. यासाठी त्यांनी बँकेकडून चार लाख रुपयांचे कर्ज काढले होते. त्यामुळे अख्ख कुटुंब द्राक्ष पीक वाढविण्यासाठी मेहनत घेत होते. मात्र शेतकऱ्यानी जीवापाड जपलेले हे पीक रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी बुडाजवळ कापून त्याची नासधूस केली. एक हजार झाडांची लागवड केली होती. मात्र यातील पाचशे झाडांची जणू कत्तलच करण्यात आली आहे. यंदा फळही येणार होते, मात्र तत्पूर्वीच पिकाची झालेली ही वाताहत पाहून संपूर्ण शिंदे कुटुंबावर आकाश कोसळले आहे.
एकूणच शिंदे यांनी चार वर्षांपासून ही द्राक्षबाग तयार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. यासाठी त्यांना कमीत कमी २ ते ३ लाख रुपये खर्च आला. तर उत्पादनानंतर पाच ते सहा लाखापर्यंत उत्पन्न मिळाले असते. या सिजनला द्राक्ष घेण्याचा हंगामाची देखील त्यांची तयारी त्यांनी करून ठेवली होती. मात्र त्याच्यावर पाणी फेरले गेले. द्राक्ष शेताची झालेली ही नासधूस संवेदनशील माणसांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेली ही घटना धक्कादायक आणि निषेधार्ह आहे.
मध्यरात्रीतून ५०० झाडे कापलेपूर्ववैमनस्यातून घडलेल्या घटनेबद्दल परिसरातील शेतकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेसंदर्भात माधव शिंदे यांनी वडाळीभोई (ता. चांदवड) पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. घटनास्थळी वडाळीभोई (ता. चांदवड) पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन या घटनेचा पंचनामा करून चौकशीस सुरुवात केली आहे. यासंदर्भात पुढील तपास पोलिस करीत आहेत. शेतकऱ्यांनी द्राक्षबागेतील झाडे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.